दर दिवाळीला न चुकता अक्का येते घरी,
आम्हाला मनापासुन वाटते ती गावाकडेच बरी.
रिक्शातुन उतरल्या उतरल्या बिल भरायला लावते,
जणु वर्ष भराचा मुक्काम ते सामान उचलायला सांगते.
सकाळी अक्काच्या गुळ्ण्या म्हणजे सगळ्या गल्लीला चिथावण्या,
दुपारी बायकांच्या गप्पात हिच्यावरच असतात बतावण्या.
पाहुणे आले तर घरी फराळाला काही उरत नाही,
६ वेळा खाउनही अक्कालाच ते पुरत नाही.
अक्काची झोप म्हणजे जरा जास्तच गाढ जमलेली,
पाहनार्याला वाटाव झोपलेली का गेलेली.
मध्यरात्रीला अक्काच ते घोरण असते महा भयंकर,
सर्कस मधल्या "मौत का कुआ" च्या गाडीतल जस सायलेन्सर.
अक्काची आंघोळ म्हणजे नॉन स्टॉप स्तोत्रांचा जलसा,
दुपार डोक्यावर आली तरी घरातला प्रत्येक जण पारोसा.
अक्का गावी परतताना डोळ्यात आमच्या पाणी येत,
तिला वाटत एक पण कारण आम्हालाच ठाउक असत.
पुढच्या वर्षीही ये म्हणुन कोणी चुकार शब्दही काढत नाही,
पण दिवाळीची अक्काची वारी आमच्या नशीबाला चुकत नाही.
- शशांक प्रतापवार