===================================================================================================
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही....!!!
===================================================================================================
===================================================================================================