ने मजसी
का अशी ही प्रीत सुमने ओंजळी कोमेजली
पाहिलेली स्वप्नं सारी अश्रु होउन सांडली
भंगणे प्रारब्ध ज्याचे स्वप्न नियती दावि का
उधळणे ज्याच्या नशीबी खेळ असला मांडि का
प्राक्तनाचा कुंचला सुख-चित्र का बेरंग करितो
मीलनोत्सुक दो जिवांच्या का ललाटी विरह लिहितो
वाहण्या आधीच देवा, फूल का निर्माल्य व्हावे
प्रीतियज्ञाच्या समीधा का चितेचे भक्ष्य व्हावे
निघुन जाई दूर तो, मी एकटी राही इथे
परतणे तो शक्य नसता वाट का मी पाहते
हासु नुरले, अश्रु सुकले, विसरला स्वर रुद्ध होणे
जीव शरिरी, मन कलेवर हे असे कसले जिणे
नियति तुजला विनवणी की संपवी माझी सजा
तो जिथे गेला तिथे तू मजसि ही घेऊन जा
............... उल्हास भिडे (२४-९-२००९)