आठवणीचे पक्षी भूतकाळाकडे झेपावतात,
आपुलकीच्या..सहानुभूतीच्या फांद्यांवर विसावतात,
मनाच्या शांत किनाऱ्यावर आठवणींची लाट आदळते...
परत जाताना सुख-दु:ख्खाचे शंख-शिंपले सोडून जाते,
पाउस पडल्यावर पाना-पानावर दवबिंदू जमतात
मग हवेच्या मंद झुळुकेने ओघळतात
तसेच तुझ्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू दाटतात
स्मृतींच्या गारव्याने हळूच ओघळतात
तुझ्या आठवणींच्या वळणावरून जाताना
वाटते तू अचानक समोर येशील,
म्हणशील "चल..झोपल्यावर बसून गप्पा मारू"
पण मलाही माहित आहे ते आता शक्य नाही
रक्ताची नातीदेखील ठिसूळ असतात
समजून उमजून जोडलेली नातीदेखील
कच्चीच असतात ...
तुझ्या आठवणींचे प्रत्येक क्षण मनात स्तब्ध आहेत
माझ्या प्रत्येक शब्दात तुझाच 'शोध' आहे
आता संकेतस्थळी जायला मनही होत नाही
तिथली प्रत्येक गोष्ट तुझीच आठवण देते
भरत आलेली जखम पुन्हा पुन्हा भळभळून वाहते ...
पराभवाच्या,अपेक्षाभंगाच्या दु:ख्खावर तुझ्या संगतीत मात केली
वाटले तुझ्याशिवाय आता कुणाच्याच आधाराची गरज नाही
पण तू निघून गेलीस अचानक जशी आलीस अचानक
आतातर सारे संदर्भहीन झाले आहे
हवा नेईल तिथे उडून जाणे माझ्या हातात आहे
आपल्या त्या स्वप्नांसाठी सगळे आयुष्याच
मला गहाण टाकावे लागणार आहे...