डाव अर्धवटच राहिला
शब्द विरूनिया गेले
शेवटच्या श्वासासंगे
जाग सारे शून्य झाले....
कितीकदा कडाडून
एकमेकांशी भांडलो
एकमेकांना सोडून
नाहीच कुठे रमलो
आता सर्वत्र सारखा
मला तुझा भास होतो
तुझी आठवण येता
जीव कासावीस होतो
रात्र जी झोपेविन
दिस जाई भूकेवीण
दिस - रात्र ओढाताण
कणाकणाने मरण
आता कुठे आयुष्याचे
मर्म मला समजले
तोच अर्ध्या प्रवासात
तुझे चालणे संपले
अजूनही कधी कधी
घेतो कानोसा दारात
अजूनही वाटते कि
येशील तू अकस्मात
खिडकीत निरोपाचा
हात तुझा नाही आता
वात पाहणारे दार
तुझ्यावीण बंद आता
लक्ष लक्ष आठवांची
यादी कशी करायची
सांग मोजायची कशी
लाट आणि लाट सागराची..??
--- व.पु.