हे माझे मीच स्व:ताला समजावीत असणे
डोळ्यांत दाटले पाणी ओठावर हसू उसणे
एखाद्या शुष्क नदीच्या प्राक्तनात असते तृष्णा
पात्रात कोरडी वाळू,काठावर मेघ बरसणे
सीमेवर सुख-दुखाच्या संज्ञाना समजत नाही
हृदयाचे स्पंदन आहे कि जखमांचे ठसठसणे
सवयीची झालीय आता एकाकी दीर्घ प्रतीक्षा
मी विसरून जातो देहाचे असणे-नसणे
नुसती वर्दळ लाटांची आणि अगतिक किनारा
भरतीने काही लिहिणे आणि ओहोटीने सारे पुसणे
इतकीच असावी माझ्या कवितेची व्याख्या साधी
शब्दांच्या अंतर्यामी दुखाला सूर गवसणे.........