अस्तमानाला जाणारा सूर्य नेहमी
तुझ्या स्मृतींकडे घेऊन जातो
गतकाळातील आठवणीना तेव्हा
उसवण्याशिवाय पर्याय नसतो...
भविष्यातल्या पराभवापेक्षा
वर्तमानातल्या विजयाची गोडी
आपल्यासाठी काही औरच होती
अनोळखी वळणावर तुझ्या
पावलांची मिळालेली साथ
एकेरी जीवनात झालेली
बेरीजच होती....
जगण्याचे सारे संदर्भ
तुझ्यापाशी येऊन थांबायचे
तेव्हा हे जीवन रम्य वाटायचे
पण आपली गुंफलेली मने
पुन्हा दुभांगानारच होती
निरोप तुझा घेताना
तुझ्या अश्रूंची ओल
आजही उरात कायम आहे
अशाही परिस्थितीत आता
जगण्यास शिकू लागलो
कधी हाती लेखणी घेऊन
आठवणीना कागदावर गुंफत राहिलो...