सांज भरतीच्या वेळी पिया परतीच्या वेळी,
दारी बसे एक खुळी विस्कटते बोटाने रांगोळी.
किती भास मनामध्ये लाजे गालावर खळी.
दूर कुठूनच्या गावाहून येई पियाचा सांगावा,
होईल उशीर जरा आज येईन उशीरच गावा.
नंतर पुन्हा निरोप येई आज नाही येत म्हणून.
मग रागावते सजणी बसते एकटीच रुसून.
म्हणे तुझ्यावाचून कसा जीवाला विसावा,
तुझा हात ना उश्याशी बघ रात जाई वाया.
मी करते शृंगार सजते घडोघडी,
तुला बरे वाटावे जरा लेते नवनवी साडी,
माझा प्रसन्न चेहरा तुला येताना दिसावा,
दिनभराच्या व्यापातून तुला मिळावा विसावा.
जास्त नाही काही माझा सजना हसवा,
पण आता कसे तुला घेऊ मायेने पदरात,
तू दूर देशी आज बघ वाया जाई रात.
सजली पुनव आज तरी एक ना चांदणी,
सुने सुने वाटे गगन ना चांद तारांगणी,
झुरे एकली तुळस दाराच्या अंगणी,
नाही देव्हार्यात देव एकली जळे निरांजनी,
सजना येतानाच्या वेळी वाट पाहते सजणी,
भूक नसे पोटामध्ये गळी उतरेना भात,
कसा लागेल तो गोड नसे भरवण्या तुझा हात,
तू दूर देशी आज बघ वाया जाई रात.
मिटून घेते दार लावून दारी कडी,
दाटे मनामध्ये भीती उघडी सत्ताड पापणी,
नसे कुशी कुणी माझ्या आहे अंधार सर्वत्र,
आज खरी वाटे भयाण मला एकलीला रात्र,
तू न केलास का माझा विचार तरी जरा
रुसली बघ आबोली रुसला गजरा,
जळे सर्व अंग अंग दुराव्याच्या सागरात,
तू दूर देशी आज बघ वाया जाई रात.
.................अमोल