सरली निवली जुनी आठवं बरसूनी यावी थेबांसंग
गंध फुटता मृदेस मनाच्या, शहारुनी जावे शिथील अंग
आसुसलेल्या स्वप्नांच्याही उमलुनी याव्या शुभ्र कळ्या
अन कोसळत्या जलधारांखाली विरघळूनी जावे फिकट रंग
भास व्हावे हातास माझ्या तिची बोटे चळण्याचे
स्पर्श तिचा होता अलगद, अंग मोहरून जाण्याचे
चिंब भिजल्या ओठास व्हावा, स्पर्श तिच्या ओठांचे
अन उसळावे लोट प्रेमाचे, खोल खोल आत उराचे
थेंब टपोरे हुकविण्या काही, तिने सावरावं जरा पदर
सौंदर्य ते पदराआडचे, पाहून खिळावी माझी नजर
लबाड माझी नजर पाहुनी, ती खट्याळ हासूनी जावी
अन पाहुनी माझीच फसगत, ओशाळावे माझे नयन
शालीत लपेटून गर्द घनांच्या, ओढून घ्यावे जवळ तिला मी
अन लवता नाजूक पापण्या, मज मिळावी मूक संमती
गुंफून हृदये दोन जीवांनी ध्वस्त व्हावे अंतर्यामी
जसे मिसळता मेघात मेघ, चमकुनी जावी सौदामिनी
कवी
मकरंद ( पंत ) आणि मी