नुकतेच आठवांच्या ढगांचे बिंब हलून गेले,
त्यात तू दिसला नि रान ओले चिंब झाले.
किती आवरावे, किती सावरावे,
तरी वळते मान,
बंद डोळे, बंद ओठ, तरी आतुर होतो प्राण.
सुन्न शरीर, खिन्न मन नि डोळ्यात थेंब आले.
तुझ्याही मनास तोच तो सुहास,
उचंबळून येते भेटण्याची आस.
तरी कोण आड येई, पाऊल परत जाई,
पुकारलेली हाक ओठांवरच राही.
शून्य भाव, भिन्न मार्ग नि काळीज ओथंब झाले.
दोघांच्याही दिशा दूर तरी जळणारा ऊर,
मार्ग न हे एक होणे हाच अटळ सूर,
ती विवश मिठी, न विसरता येणाऱ्या भेटी,
आठवतात अंतरंगात,
आज होत पछ्चाताप अहंकाराच्या अंधारात,
न भेटलो जरी होतो पावलाच्या अंतरात.
पाऊल जरा अडखळले, तुझे शब्द कानी आले,
हवे होते मला जसे तसेच तू मला थांब म्हटले.
मनात फुलली राने, कानात ऐकू ये गाणे,
मी मलाच मिटून घेतले तुझ्या शरीराने,
आतुर माझ्या कानांना जेव्हा तुझी हाक आली,
हिरमुसलेल्या जीवनात उल्हासाचे पुन्हा कोंब उमलले.
हे तुझ्यावाचून कोणास असते मला थांबवायला,
तुलाच असे जमते दरवेळी मला भांबावायला,
तू म्हटलेस थांब जेव्हा माझी मी न राहिले,
वळून अन वाट काढीत तुझ्या मिठीत सामाविले,
तुझ्या वाचून या उनाड रानी, तुझी हाक ऐकून कानी,
पालवीला उमलण्याचे किती नवे जोम आले.
भानावर आले जेव्हा तू तुझ्याच वाटेवर होतास,
हाक तुझी कुठली तो केवळ एक भास.
माझेच मन वेडे अन कसे सुटेल हे कोडे,
हिरमुसले क्षणात अन मावळले ते सारे
जे हिरवे कोंब नव्याने होते उमललेले.
...अमोल