बर्फ बर्फ झालिये छाती
आणि मी बोंबल्तोय भाषेसाठी माझ्या
तोंडावर, कानात, माईकमधून,
रेडियोतून, आकाशवाणी करतोय,
ढगांतून कोसळतोय
माझे शब्द बघतायत
बुडत चाल्लेली माझी भाषा
अथांग गर्दीत, कोलाहलात
बर्फ बर्फ पडतोय छातीत
मला बघितल्याचं आठवतंय
माझ्या भाषेतून पडणाऱ्या सावल्या आणि उन्हांना
मी जाणतो माझ्या भाषेची ऊब
आणि रुबाब.
गुणगुणलिये माझी भाषा,
गाताना झालोय बेभान.
आमच्या भाषेतून मोठं होत जाताना पाहिलंय
सच्याला, लताला, गावस्करला, आशाला.
तुम्ही नव्हतात, तुमचे बापजादे नव्हते
तेव्हापासूनची आक्रमणं अनुभवलियेत
माझ्या भाषेतून, माझ्या भाषेवरची
माझ्या भाषेतून उठून उभे राहात
इतिहासात जाऊन स्थानापन्न झालेले पाहिलेत
शिवबा, सावरकर, आंबेडकर, फुले, टिळक, मुंबईचे हुतात्मे.
गेली चारपाचशे वर्षं
माणसांना
जीनेका बहाना
देऊन गेलेले
जबरदस्त संतकवी बघितलेत;
सतरा वर्षांच्या पोरट्याला म्हटलंय माऊली...
सह्याद्रीवर उभा राहून
मानलंय धन्य या जन्माला
...आणि जेव्हा या भाषेच्या पवित्रतेला जपण्यासाठी
मी मारलिये माझ्याच लोकांना भाबडी हाक
तेव्हा तुमच्या घाणेरड्या गटारी हिशोबांमध्ये
मलाही मोजलंय तुम्ही
राजकीय थुंकी लावून
बर्फ बर्फ पडत असेलंच ना छातीत?
दडा बसत असेलंच ना?
फरार होऊन, पसार होऊन जावं निघून
हा मूर्ख बडबड्या बहिऱ्या तोंडाचा बाजारमागं ठेवून;
वाटत असेलंच ना?
...कधीतरी दमून, कंटाळून
बंद पडलो मी जुन्या टिव्हीसारखा
तर थापट्या, थपडा मारून
’उठ, उठ’ म्हणू नका मला..
सुजीत