पावनखिंड
उभा राहिलो मी या खिंडीत
करुनि छातीचा अभेद्य कोट
सरसावुनी हाती पेलला भाला
महादेवाचा नारा दुमदुमला
झाली रणचंडी आज प्रसन्न
तृप्त झाली यवनी बळी घेऊन
सडा घातला रक्त शिंपुन
आज घोडखिंड झाली पावन
मावळे लढले शिर घेऊनी हाती
गोजिरे दिसती खेळुनी लाल होळी
झेलण्या घाव ते क्रुर क्रुर यवनी
ना उरली जागा त्यांच्या देहावरी
जरी विदिर्ण झाली छाती
विझु पहाते जरी प्राणज्योती
खड.ग घेऊनी दोन्ही हाती
नाही पत्करी शरणागती
हा देह अर्पिला शिवबाला
हा देह अर्पिला स्वराज्याला
पडेल तेव्हा तो धारातिरी
जेव्हा राजा पोचेल विशाली
हा क्षण अखेरचा आला
तोफा ऐकण्यास जीव आतुरला
शेवटचा मुजरा राजा तुला
डाव अर्धा सोडुनी बाजी चालला
- सलील देशपांडे