अवघडल्या पोटावरुन
ती जेंव्हा फिरवायची हात
आईची माया पोरीला
जाणवायची आत
मायेचा धागा ...ती ह्ळुवार नाळ
घट्ट पकडून ठेवी ...ते इवलंसं बाळ
दिवसभर चालायच्या मग
मायलेकींच्या गप्पा
भरून जायचा स्वप्नांनी
ओल्या मनाचा कप्पा
बापाला मात्र, नको होती
ही चिमुकली कळी
’मुलगी होणार आपल्याला’
हे त्याच्या उतरेनाच गळी
तो म्हणाला... हा धागा तोडायचं, नसतं आलं ओठात....
तो म्हणाला... हा धागा तोडायचं
नसतं आलं ओठात
जर ’ती’ ऎवजी ’तो’ असता
वाढत तुझ्या पोटात
शहारलेलं बाळ तिचं
तिला घट्ट घट्ट बिलगलं
अन जगामधल्या प्रत्येक ’ती’चं
अस्तित्वच हदरलं
प्रत्येक ’ती’ मग पेटून उठली
हात त्याचा धरायला
तिचा हा जीवघेणा उन्माद पाहून
लागे प्रत्येक ’तो’ थरथरायला
’ती’ फुलंही बंड करुन उठली
अन ’तो’ गंध क्षणात तडफडून मेला...
सावलीविना एकटा पडलेला
’
तो’ प्रकाश कुजुन सडून गेला...
मग क्रोधिष्ट हवा घेऊन आली
............मुसळधार बरसता झंझावात
दिसेल जो ’तो’, जळून मेला
..........विद्युल्लतेच्या संतापात
ति’च्या अस्तित्वाचा रौद्र तांडव
भीषण उत्पात करत गेला....
अन मायलेकींचा हळूवार कप्पा
नव्या स्वप्नांनी भरत गेला...
--- धुंद रवी