बेछूट मी बेफाम मी मजला कुणी रोखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे
श्वासात स्वप्ने पाहतो मी
मुक्त जगणे जाणतो
वाट कुठली चालणे ना
निर्झरासम वाहतो
भावनांचे गाठोडे माझे कुणी सोडायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे
हातावरी जो आज आहे
तो सुखाने भोगतो
अन् उद्याच्या जीवनाची
मी तमा ना ठेवतो
तमस की उजळून आहे भाग्य ना जाणायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे
मी द्वेष ना केला कुणाचा
शत्रु ना झाले कुणी
तेथ जुळले सूर माझे
जेथ हो संवादही
गुंतणे ठाऊक ना जे जोडले राखायचे
बंध पडतील तोकडे मजला कुणी बांधायचे
....रसप....