शिवरायांच्या काळातील कविराज भूषण यांनी ब्रज भाषेतील काव्याच्या माध्यमातून महाराजांबद्दलची आपली भावना मांडली आहे. राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या काळात हे कविराज महाराजांना भेटले होते. त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे रचलेली एक कविता अशी -
इंद्र जिमी जृंभ पर
बाडव सअंभ पर
रावण सदंभ पर
रघुकुलराज है।
पवन बारिबाह पर
संभु रतिनाह पर
ज्यो सहसबाह पर
राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर
चीता मृगझुंड पर
भूषण वितुंड पर
जैसे मृगराज है।
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यो म्लेंछ बंस पर
शेर शिवराज है
शेर शिवराज है।
याचा अर्थ, जंभासुर नावाच्या राक्षसाचा ज्याप्रमाणे इंद्राने वध केला, समुद्रावर जसा वडवाग्नी कोसळतो, गर्विष्ठ रावणाचा जसा रघुकुलराज रामचंद्राने नाश केला; वादळ ज्याप्रमाणे मेघांचा नाश करते, मदनाचा ज्याप्रमाणे शंकराने, सहस्त्रार्जुनाचा ज्याप्रमाणे परशुरामाने संहार केला, दावाग्नी ज्याप्रमाणे वृक्षांचा नाश करतो, हरिणांच्या कळपावर चित्ता ज्याप्रमाणे तुटून पडतो, प्रकाश जसा अंधाराचा नाश करतो, कृष्णाने जसा कंसाचा वध केला त्याचप्रमाणे शिवराजा म्लेंच्छांचा नाश करतो.