माज्या बा चा बा
व्हता माणुस लई येगळा
पटका लाल डोई वरती
अंगी डगला व्हता ढगळा....
माजा बा जवा मला
सांगी त्याची ही कहाणी
मनात होई चर चर..
होई काळजाच पाणी पाणी...
जीवाभावाची त्याची सोबतीण
असायची नेहमीच आजारी....
पण ह्यो गडी व्हता लई भारी
एकट्यानच पोसली...दोन पोरं चार पोरी..
व्हता नावावर त्याच्या
एक तुकडा भुई चा
होती कूस तिची वांझोटी
न दिसे कण गवताचा
राबून दिसभर....दुसऱ्याच्या शेती
घरी येई हा घेउन..घामी भिजलेला पैका
ठेवी एक एक आणं, एका एका हाती
मागे बदल्यात त्याच्या..गालावरी एक मुका...
राती निजल्यावर माजा बा
ठेवी हात त्याच्या डोई वर
बोली आपल्याच मनाशी
"माजा ल्योक, व्हईल मोटा हाफिसर "
झाला हैराण.... केलं साऱ्या जीवाचं एक रानं
ठेवून स्वतःला गहाण ...जोडले दोन पैके यानं हाती
दुसऱ्याच दिशी .....भल्या रामाचिया पारी ....
सोडून आला माज्या बा ला ...दूर शाळंच्या दारी
माज्या बा न ही मग... धरला एकच तो ध्यास
करून दाखवेन सार्थ ....त्याच्या बा चा विश्वास
केल प्रयत्न अथक ...मिळविला फस्क्लास.... (फर्स्ट क्लास)
सांगाया गेला गावी ...बातमी ही ख़ास...
ऐकून पोराचा निकाल...डोळं झाली त्याची लाल
उलट्या हातानं पुसताना डोळे...
माज्या बा न बघितली...त्याच्या तळहातावरली फोड़े
नाही रडला माजा बाप... दाबून हुंदका आतल्या आत
गेला परत तो शाळंत... बांधून मनाशी खुणगाठं
काही वरसानी माजा बा... मोटा हाफिसर जाला...
बाप तवा त्याचा...व्हता खिळला बाजंला
जवा ऐकली त्यानं...बातमी ही लाख मोलाची..
धडपडला बाजंतुन...निघाला टेकवित काठी...
पुसता माज्या बा नं..बोलला माघारी वळून..
चाललो फेडाया नवस..केला होता तुज्यासाठी...
तवा मातर माजा बा...रडला डोळे भरून....
माझ्या आजोबाच्या फोटुवरील हारातल्या झेंडू प्रमाणं
आज बी माझ्या बा च्या डोळ्यातलं पाणी ताजंच व्हतं.....
--पंकज सोनवणे....(स्वरचित)