काही चिंता नाही
स्फोट होवो नाहीतर चिंधड्या उडो,
आजचं जिणं जिण्याचं खोटं समाधान मिळो
त्या क्षुद्र मृत्यूची, आम्हाला फिकीर नाही
सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
पाऊल वाकडं पडो, अनैतिक संबंध घडो
पश्चाताप पोटी वाढवत, नऊ महिने सरो
उद्या कचर्यात टाकण्याची, आज भ्रांत नाही
सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
नव्या रुंद रस्त्यांवर, रईस गाड्या पळो
भिक्कार गरीब माणसं, गाडीखाली मरो
जामीन तयार आहे, पैशांची कमी नाही
सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
पोलीस बलिदान देवो, लष्कर कामी येवो
करोडो रुपये खर्चून, गुन्हा शाबित होवो
राष्ट्रपती पावेस्तोवर, कसाब मरणार नाही
सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
लक्षाधीश होवो, अब्जाधीश होवो
आमचे नेते असेच साधे भोळे राहो
भिकारी झाला कुबेर, पण झोळी भरत नाही
सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
लोकशाहीचा यज्ञ, असाच पेटता राहो
आश्वासनांचं भस्म, सदैव भाळी लागो
आशांची समिधा मात्र, कधीच विझणार नाही
कारण, सारं आलबेल आहे, काही चिंता नाही
माझा मित्र मकरंद केतकर.