माझ्या भाषेच्या गोंधळातून दूर घेऊन चल
तुझं गिटार, तुझा पियानो जिथं निर्मळ होतात
मला शिकव तुझा रोल कसा करायचा
मला दाखव पक्षी उडताना तू कसा बघतोस
किंवा गळलं पान जमिनीवर उतरताना काय विचार करतोस
माझ्या भाषेच्या गोंधळातून दूर घेऊन चल
तुझं गिटार, तुझा पियानो जिथं निर्मळ होतात
मला सांग सुरूवात आणि शेवट काय आहे
माझ्या मनाला हात घालून म्हण ’सगळं ठीक होईल’
किंवा सांग तरी हट्ट माझा रक्तामधून माझ्या कधी जाईल?
माझ्या भाषेच्या गोंधळातून दूर घेऊन चल
तुझं गिटार, तुझा पियानो जिथं निर्मळ होतात
मला फाडलेल्या कविता गोळा करू दे
मला तुझ्या माझ्या पलिकडे जाऊ दे
तुझ्या माझ्या संबंधांना मला एका तरी कवितेत बसवू दे
माझ्या भाषेच्या गोंधळातून दूर घेऊन चल
तुझं गिटार, तुझा पियानो जिथं निर्मळ होतात