"बचेंगे तो और भी लडेंगे" या मराठी बाण्याच्यावरून स्फुरलेल्या ओळी
हजार घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे |
जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे|
पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे |
कंठनाल छेदुनही झुंजणारा देह बाकी आहे|
घात करूनही आप्तांनी साथीस सह्याद्री बाकी आहे|
कैद होवूनही शंभू अंतरी स्वराज्य बाकी आहे |
एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे|
जरी पराभव झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द बाकी आहे |
-
©परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२१/०१/२०११