माझ्या बाबांना सांग, मोठा झालोय मी
तुमची तगमग तुमची धडपड
आता माझी झालीय
लवकर उठण्याची आता
मला सवय झालीय.
सकाळचा चहा दुपारी होतो
जेवणाची वेळच बदललीय
कामातला बॉस आता रागवत नाही
त्याला माझ्या कडे बघवत नाही
त्यालाही कळलंय माझे वागणं
माझ्या कडे दुसरा पर्यायच नाही
लोकलची गर्दी आवडायला लागलीय
लोकांशी मैत्री वाढायला लागलीय
तुमच्या जागेवर आता मी बसतो
आडनावाने माझी ओळख व्हायला लागलीय
तुमच्या जबाबदाऱ्या माझ्या झाल्यात
त्रास होतोय पण निर्धार करीन
आजवर मी स्वप्नात वावरलो
सर्वांच्या इच्छा पूर्ण करीन
उशिरा का होईना शहाणपण सुचलंय मला
पेल्यातल्या वादळांच गुपित कळलंय मला
आता कुठे मी प्रवास सुरु केलाय
तुम्ही आहात त्या किनार्यावर यायचं मला.
देवा माझ्या बाबांना सांग, खरच मोठा झालोय मी
मैत्रेय.