Author Topic: एक जानेवारी : एक संकल्प दिन....... पु ल देशपांडे  (Read 1969 times)

Offline Prasad Chindarkar

 • Jr. Member
 • **
 • Posts: 80
 • Gender: Male
एक जानेवारी : एक संकल्प दिन

नव्या वर्षाचे स्वागत आपण हसतमुखाने करु या, अर्थात दाढ वगैरे दुखत नसेल तर. साध्या मुखाचे हसतमुख करण्यात ती एक अडचण असते. ते एक असो. नव्या वर्षाचा पहिला दिवस हा नवे संकल्प सोडायचा दिवस असतो. या बाबतीत पुरुषवर्गाचा उत्साह दांडगा. नव्या वर्षाच्या प्रथम दिवशी पुरुषांच्या उत्साहाने स्त्रियांनी काही नवा संकल्प सोडल्याचे आमच्या ऐकिवात नाही. 'आहेत त्या साडया फाटून गेल्याशिवाय नवीन घेणार नाही' अशा नमुन्याचा किंवा 'सिगरेट सोडली' या चाली वर 'पावडर सोडली' हा थाटाचा संपूर्ण इहवादी संकल्प एक जानेवारीचा मुहूर्त साधून सोडलेली स्त्री आमच्या पाहण्यात नाही. आलीच तर तिला आम्ही कडकडून भेटायला तयार आहो. (हा केवळ भाषाविलास) पुरुष मंडळींना मात्र असले-म्हणजे साडी फाटेपर्यंत नवीन घेण्याचे नव्हे-सिगरेट सोडण्याचे, स्वखर्चाने दारु न पिण्याचे वगैरे संकल्प सोडल्याशिवाय एक जानेवारी हा दिन साजरा झाल्यासारखे किंवा नव्या वर्षाचे आपण यथायोग्य स्वागत केल्यासारखे वाटत नाही. एक जानेवारी पासून सिगरेट ओढायची नाही हा मात्र बराच लोकप्रिय संकल्प आहे. मात्र त्याला दोन जानेवारीपासूनच फाटे फुटतात.
पहिला फाटा : पाकीट घ्यायचं नाही. एकेक सुटी सिगरेट घ्यायची.

दुसरा फाटा : अर्धीअर्धी ओढायची.
तिसरा फाटा : दुसऱ्या कोणी दिली तरच ओढायची.
चौथा फाटा : रात्री नऊच्या पुढे ओढायची नाही.
पाचवा फाटा : फक्त जेवणानंतर ओढायची.
सहावा फाटा : चहा व जेवणानंतर.
सातवा फाटा : रात्री नऊऐवजी दहाच्या पुढे ओढायची नाही.
आठवा फाटा : इंपोर्टेड सिगरेटमधला टोबॅको प्युअर असल्यामुळे ते पाकीटच्या पाकीट ओढले
तरी नो हार्म इज कॉजड् इ.इ.

...'सिगरेट सोडणे' या प्रमाणे एक जानेवारीपासून नित्यनेमाने डायरी लिहिणे, पहाटे उठून मैदानात फिरायला जाणे, गच्चीवर फेऱ्या घालणे, अंगणात फेऱ्या घालणे, घरातल्या घरात फेऱ्या घालणे, योगासने करणे, जागच्या जागी धावणे, हे देखील सुप्रासिद्ध संकल्प आहेत. आम्ही दर ५-६ वर्षांनी आलटूनपालटून हे संकल्प नव्या उमेदीने सोडीत आलो आहो...

... ते काही का असेना, एक जानेवारी आली की नवे संकल्प मनात गर्दी करायला लागतात आणि भेटीदाखल येणाऱ्या डायरीची प्रातिक्षा सुरु होते. हा नव्या संकल्पात कालमानाप्रामाणे जुनी पत्रे एकदा नीट पाहून, नको असलेली फाडून टाकून व्यवस्थित लावून ठेवावी, ठिकठिकाणी निर्वासितांसारख्या तळ ठोकून पडलेल्या पुस्तकांच्या आणि मासिकांच्या गठ्ठयावरची धूळ झटकून त्यांची विषयवार विभागणी करुन, वहीत नोंद करावी असे काही संसारोपयोगी संकल्पही असतात. ते पार पडतात की नाही याला महत्त्व नाही. खरी मजा वेळोवेळी आपल्याला कुठले संकल्प सोडावेसे वाटले ते पाहण्यात आहे. ते नाही पाळता आले म्हणून हताश होऊ नये...

... संकल्पाचा आनंद हा प्रत्यक्षाहून अधिक असतो. फार तर सकाळी उठणे, डायरी लिहिणे, सिगरेट न ओढणे, एकदाच जेवणे अशा सद्गुणांची ही मानसपूजा आहे असे मानावे. कल्पनेतल्या धूपदीपांनी जिथे देव खूष होतो तिथे कल्पनेतल्या सज्जनपणाने माणसाने तृप्त राहायला काय हरकत आहे?

तेव्हा आजचा दिवस हा असा कृतीची जबाबदारी न घेता सद्गुणवर्धक संकल्प सोडण्याचा. तो सोडणार असल्याने चारचौघात सांगण्याचा आणि फार तर दोन ते सहा-सात जानेवारींपर्यंत टिकवण्याचा. कुणाचा गणपती दीड दिवसाचा,तर कुणाचा दहा दिवसांचा असतो. तीच गोष्ट संकल्पाची. पुष्कळदा वाटतं की नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प सोडायची जगातल्या इतक्या लोकांना जर हौस आहे तर एक जानेवारी हा संकल्प-दिन म्हणून साऱ्या जगाने का साजरा करु नये? आपल्या देशात वर्षाचे दिवस तीनशे पासष्ट असले तरी 'दिन' पाच-सहाशे असतील. 'दिनांच्या दिवशी जरी जाहीर संकल्प सोडला तरी तो दुसऱ्या दिवशीसुद्धा पाळायची गरज नसते' हा धडा आपल्या मान्यवर नेत्यांनीच नाही का आपल्याला घालून दिला? शिवाय एक जानेवारी हा दिन संकल्प-दिन म्हणून साजरा करण्यावाचून आपल्याला गती नाही. 'यंदाच्या वर्षी कुठलाही संकल्प सोडणार नाही,'असे म्हणणेहे देखील संकल्प न सोडण्याचा संकल्प सोडण्यासारखेच आहे.
तेव्हा आजच्या या शुभदिनी आपण सारेजण 'सत्य संकल्पाचा दाता भगवान' असे म्हणू या आणि कुठला तरी संकल्प सोडून नव्या वर्षाचे-एव्हाना दाढदुखी बंद होऊन डोकेदुखी सुरु झाली नसेल तर- हसतमुखाने स्वागत करु या...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
mhanun mi kahi sankalapach karat nahi :P .........
:D chan ahe lekh .........

Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita