सवाल
तुकारामबाबा रागवू नका
एकच गोष्ट सांगून टाका
शिववा घेऊन आले सोने
तेवढ्यात तुम्हांला सुचले गाणे
‘‘ सोने आणि माती आम्हां
समान हे चिती -’’
भलत्या वेळी ओठी फुटले
शिवबाला ते खरेच वाटले
जेव्हा घेऊन गेला वित्त
तुमचे भडकले का पित्त
जर का ठेवता सोनेनाणे
तुम्ही विकले नसते गाणे ?
हातचा टाळ काय दुपार टाळतो ?
वीणेवर काय वाणी भाळतो ?
विठुनामाची तुमची पेठ
पण संतांनाहि लागतोच शेठ !
तुकयाबाबा केव्हा येता ,
सवालाला उत्तर देता ?
तेच विमान घेऊन यावे
सांताक्रुझला भेटून जावे !
हेचि दान दे गा देवा
माझा विसर न व्हावा !