पुलंचे किस्से आणि कोट्या
अंजिरांचा काय भाव आहे?
पुलंच्या लहानपणाचा एक प्रसंग.
पुलं तेव्हा चौदा पंधरा वर्षांचे होते. लोकमान्य सेवा संघात साहित्यसम्राट न. चिं. केळकरांचं व्याख्यान होतं. व्याख्यानानंतर होणा-या प्रश्नोत्तरात शाळकरी पुरुषोत्तमनं प्रश्न विचारला. त्या काळी भारतानं फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये यावर चर्चा चालू होती. तर पुरुषोत्तमनं तात्यासाहेबांना विचारलं की फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारू नये ?
त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं,
‘ स्वीकारू नये, पण राबवावं. ’
यावर पुरुषोत्तम म्हणाला, मला आपलं उत्तर कळलं नाही.
त्यावर तात्यासाहेब म्हणाले, ‘ आपल्याला कळेल असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा. ’
त्यावर पुरुषोत्तमांनी तात्काळ प्रश्न विचारला
‘ पुण्याला सध्या अंजिरांचा काय भाव आहे ?’
गणपतीपप्पा!
काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं.
गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ‘ पुलं ’ गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले,
‘ आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ‘ गणपतीपप्पा ’ झाल्यासारखा वाटतो ’ .
लोकांना मर्ढेकर ऐकायचेत
पु.लं. आणि सुनिताबाई मर्ढेकरांच्या कवितांचं छान सादरीकरण करत.
एकदा एन. सी. पी. ए. थिएटरमध्ये हा मर्
ढेकरांच्या कवितांचा कार्यक्रम होणार होता. त्यावेळी थिएटरच्या गेस्ट हाउसमध्ये जेवणाची सोय नव्हती, म्हणून जयंतराव साळगावकारांनी दुपारच्या जेवणाची व्यवस्था आपल्या घरुन केली. ऐन वेळी कुणी पाहुणा आला तर गैरसोय म्हणून जेवण थोडं अधिकच पाठवलं होते.
तो मोठ्ठा डबा पाहिल्यावर पु.ल. लगेच म्हणाले,
‘ अहो, आम्हाला संध्याकाळी लोकांना मर्ढेकर ऐकवायचेत, ढेकर नव्हे !’
'बो'लावल्याशिवाय कुठंही जाऊ नये
शंतनुराव किर्लोस्करांचं नाव घेतलं रे घेतलं , की त्यांची गळ्यात ‘ बो
’ असलेली आणि सुटाबुटांतली तजेलदार मूर्ती डोळ्यांसमोर पटकन उभी राहते .
एकानं पुलंना सहजच विचारलं , ‘ भाई शंतनुराव किर्लोस्कर नेहमी ‘ बो ’ का हो लावायचे ?
त्यावर पुलंनी लागलीच उत्तर दिलं , ‘ त्याचं काय आहे , शंतनुरावांच्या लहानपणी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं , की ‘ बाबा रे , बोलावल्याशिवाय कुठंही जाऊ नये .’ तेव्हापासून शंतनुराव ‘ बो ’ लावल्याशिवाय कुठंही जात नसत .’
द्राक्ष संस्कृती आणि रुद्राक्ष संस्कृती!
प्रा. विद्याधर पुंडलिकांनी एका मुलाखतीत पुलंना विचारलं,
‘ तुम्हाला आवडलेली तुमची सर्वात धमाल कोटी किंवा विनोद कोणता ? ( त्या पुंडलिकाला म्हणावं, ‘ त्यानं फेकलेल्या विटेवर मी उभा नाही ’, ही माझ्यावरची कोटी सोडून. )’
तेव्हा पुलं म्हणाले, ‘ एखाद्या कवीला ‘ तुझं कुठलं यमक चांगलं जुळलं ? असं विचारण्यासारखा हा प्रश्न आहे . तरी पण मला विचारता आहात , म्हणून सांगतो . मी पॅरिसला गेलो होतो . तिथं शॅम्पेन घेताना त्याच्या आणि आपल्या संस्कृतीत फरक काय , असं कुणी तरी विचारल्यावर मी चटकन म्हणालो , ‘ तुमची द्राक्ष संस्कृती आणि आमची रुद्राक्ष संस्कृती !’
गंमत म्हणून आणखी एक कोटी सांगतो . ब्लड बँकेसाठी नेहमी येणा - या - जाणा - या माणसाकडून रक्त मागणा - या लीलाबाई मुळगावकरांवरुन ‘ हिच्याइतकी रक्तपिपासू बाई मी आजवर पाहिली नाही ’ असा विनोद मी केला होता ’
गर्व से कहो हम हिंदुजा में है!
गर्व से कहो , हम हिंदू हैं, ’ म्हणणारे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाह
ेब ठाकरे यांना प्रकृति - अस्वास्थाच्या कारणास्तव माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
पुण्यात पुलंपर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा बाळासाहेब हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्या खोलीत उपचार करुन घेत होते, त्या खोलीच्या दरवाज्यावर ठळक अक्षरात ‘ गर्व से कहो, हम हिंदुजा मे हैं ’ असं लिहून ठेवायला काहीच हरकत नाही, अशी पुलंनी उस्फुर्त प्रतिक्रिया केली.
कळलं हिंदीत पायाला पाव का म्हणतात?
एका आजारात पुलंची दोन्ही पावलं सुजून गुबगुबीत दिसत होती .
त्यावेळी भेटायला आलेल्या एका मित्राला आपल्या आपल्या सुजलेल्या पायांकडे बोट दाखवत पु . ल . म्हणाले , ‘ हे माझे पाय बघ , म्हणजे तुला कळेल , पायाला हिंदीत ‘ पाव ’ का म्हणतात ते !’
माझ्या बंधू आणि भगिनींनो...
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात पुलंच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांच्या असंख्य चाहत्यांपैकी काही निवडक जणांची प्रातिनिधिक भाषणं होणार होती. त्यात सुप्रसिद्ध वैज्ञानिक जयंतराव नारळीकरांचं नाव होतं.
भाषणाला सुरुवात करताना गर्दीचा वेध घेत नारळीकर म्हणाले,
‘ सभ्य स्त्रीपुरुष हो... मी नेहमीप्रमाणे भगिनींनो म्हणत नाही, कारण समोरच माझी पत्नी बसलेली आहे. ’
त्यानंतर पु.लं. जेव्हा बोलायला उभे राहिले, तेव्हा जयंतराव नारळीकरांच्या दाद मिळालेल्या भाषणाचा सूर पकडत भाषणाची सुरुवात करत म्हणाले,
‘ बंधू आणि भगिनींनो... समोर माझी पत्नी बसलेली आहे, तरीही मी ‘ बंधू आणि भगिनींनो... ’ अशीच सुरुवात करतोय, कारण ती मला ‘ भाई ’ म्हणते ’
संजय उवाच!
आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले,
‘ मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ‘ संजय उवाच ’ असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !’
पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ‘ त्यांना आत कंठ फुटला आहे ’ असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते.
त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ‘ गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही !
'अवतार' ध्यान!
एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं.
प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ?
एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता.
तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ‘ हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ’
पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ‘ अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ‘ अवतार ’ ध्यान का म्हणतात, ते समजलं. ’
भाई, ही इज चार्जिंग!
एकदा पुलं गोव्याहून पुण्याला मोटारनं येत होते. त्यांच्यासोबत वसंतराव देशपांडे आणि सुनीताबाई होत्या. वाटेत एक जंगल लागलं. जंगलाच्या आडवळणावर एक महाकाय बायसन (गवा / रानरेडा) त्यांच्या गाडीसमोर आडवा आला.
रानरेडा हा महाशक्तिशाली आणि आक्रमक प्राणी ! त्यानं धडक दिली तर ट्रकही आडवा होईल. तिथं फिअॅट गाडी काहीच नाही. एक अर्थानं समोर प्राणसंकटच उभं ठाकलेलं.
प्राणभयानं घाबरुन गेलेले वसंतराव देशपांडे पुलंना हळूच म्हणाले, ‘ भाई ही इज चार्जिंग !’
वसंतरावांच्या तोंडचे हे इंग्रजी उद्गार ऐकून तसल्या जीवघेण्या प्रसंगातही पु.ल. म्हणाले, ‘ त्या गव्याला कळू नये, म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलताहेत !’
मिठाई फुकट, वाटतं?
एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ‘ बॉक्स मिळेल का ?’ म्हणून विचारलं.
‘ हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ’ दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ‘ अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले.
मामा नावाची गंमत
गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ‘ मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ’
पिताश्री किंवा राष्ट्रपिता
हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ‘ त्यात काय ? ‘ सफरचंद ’ म्हणावं. ’
मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ‘ एअरहोस्टेसला आपण ‘ हवाई सुंदरी ’ म्हणतो, तर नर्सला ‘ दवाई सुंदरी ’ का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ‘ वाढपी ’ म्हणतो, तर वैमानिकाला ‘ उडपी ’ का म्हणू नये ?’
त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ‘ पिताश्री ’ किंवा ‘ राष्ट्रपिता ’ म्हणतात .
चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं!
अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले,
‘ चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज.
‘ चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते.
जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ‘ आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ’
चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ‘ चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !’
आज और कल
पुलंच्या ‘ सुंदर मी होणार ’ या नाटकावर आधारित असलेला ‘ आज और कल ’ हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ‘ हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ‘ आज और कल !’
ऊस
कोल्हापूर आणि तेथील एकूणच भाषाव्यवहार म्हणजे पु . लं . च्या मर्मबंधातील ठेव . कोल्हापुरी समाजाइतकाच कोल्हापुरी भाषेचा बाज सांगतांना ते म्हणाले , ' इथे रंकाळयाला रक्काळा म्हणतात पण नगा - याचा नंगारा करतात . कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे . ' त्यानं शेतात ऊंस लावला ' याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणं ' यू ' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता .
गाऊन दाखवा
अलीकडेच मुंबईत पडलेल्या प्रलयंकारी पावसाच्या दिवशी एन. सी. पी. ए मधून ' वराती ' ची तालिम आटोपून मी व माझी मैत्रिण मीना फडके , कमरेएवढया साचलेल्या पाण्यातून चिंब भिजून माझ्याघरी पोहाचलो. मीनाला त्या रात्री माझा गाऊन घालून माझ्याचकडे रात्र घालवावी लागली. ही गोष्ट मी सगळयांना ऐकवली होती. भाईंच्याही ती कानावर गेली. त्यावर ते म्हणाले , ' तरीच परवा यशवंत देवांना कुणीतरी म्हणाले , की गाऊन दाखवा. ' तर नीला म्हणाली ,' बरोबर आणला नाही. '
कोल्हापुरी साज
कोल्हापूरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मैत्रीण नुकतीच
बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सांगत होती , ' काय सुंदर सुंदर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात. अप्रतिम नमुने आणि सुंदर कलाकुसर , अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळयात की दुसरं काहीच घालायला नको. ' हे ऐकत जवळपास असलेले भाई मिश्किलपणे हळूच म्हणाले , ' खरं सांगतेस की काय ?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर मैत्रिणीची लाजून व आमची हसून मुरकुंडी वळली.
'सबकुछ पुलं'ला आमंत्रणच नाही
पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ' गुळाचा गणपती '! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा , पटकथा , संवाद , गीते , संगीत आणि दिग्दर्शन , एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला!
(पुलं एक साठवणच्या जयवंत दळवीलिखित प्रस्तावनेतून)
पुलंकित
१९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या
भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला.
पुलंचा हजरजबाबी विनोद
पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी. दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच ‘ ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय ’ असे उद्गार काढले.
जगवले खाद्यजीवनाने
हिंदी-चिनी युद्धाच्या वेळी आघाडीवरला एक मराठी सैनिक कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होता. त्यांच्या अंगावर पुरेसे लोकरी कपडे नव्हते. म्हणून बरोबर आणलेले काही दिवाळी अंक तो धगीसाठी जाळू लागला. जाळण्याआधी चाळता चाळता त्याला एका अंकात ‘ पु. ल. देशपांडे ’ हे नाव दिसले. लेखाचे नाव दिसले. लेखाचे नाव- ‘ माझे खाद्यजीवन ’! तो अंक आगीत टाकण्याआधी त्याने वाचायला घेतला. थंडीत एकूणच जिवाला तो वैतागला होता. पण पुलंचा हा लेख वाचल्यावर ‘ छे ! छे ! हे सारे खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे ’ असा त्याने आपल्या मनाशी निर्धार केला. तुमच्या लेखामुळे मला जगावेसे वाटले असे त्याने पुलंना कळवले तेव्हासुद्धा पुलंची तीच गत झाली.
पुलं, टिळक आणि चिवडा
‘ माझे खाद्यजीवन ’ या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , ‘‘ चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ‘ रम ’ ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....’’ हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा .
त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा !
शान्ता शेळके आणि पुलं!
'' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... ''
'' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?''
फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ...
बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा