कवी संदीप खरे यांचा गेस्टरूम सदरातला शेवटचा लेख
( १)
दुसरीतला एक मुलगा खूप अस्वस्थ आहे. पोटात सारखा गोळा येतोय त्याच्या...
डोळे आतून गरम झालेत. आजोळी आलाय काही दिवसांसाठी...
आणि आता थोड्याच वेळात पुन्हा घरी जायचंय...
७-८ दिवस खूप खेळलाय, मजा केलीय, लाड झालेत.
पण खरं सांगायचं तर आल्या दिवसापासून त्याला भीती वाटतेय ती याच क्षणाची..
आजीच्या कुशीत झोपताना, आजोबांची गोष्ट ऐकताना, दंगा मांडताना,
सतत त्याच्या मनात हा नकोनकोसा क्षण कधीचाच ठाण मांडून राहिलाय...
कितीही दुर्लक्ष करून खेळात रमायचा प्रत्यन केला तरी गाण्यामागे तानपुऱ्याचा षडज् लागून रहावा,
तसा हा 'निरोप' सारखा कावराबावरा करत राहिलाय त्याला.
लहानच आहे तो, पण निघताना पाया पडताना आजीचा हात जरा जास्तच मऊ झालाय
आणि आजोबांचे डोळे अजून सौम्य, ओले हे जाणवतंय त्याला. तो रडला नाही निघताना,
पण निरोपाच्या वेळी रात्रीच्या अंधारात सौम्य आवाजात सतत सरसरत राहणारा पाऊस
आणि मनात जे काही होतंय; या दोघांत उगाचच काहीतरी साम्य आहे
असं वाटत राहिलंय त्याला... अजूनही...!
२)
कॅन्सरच्या लास्ट स्टेज पेशंटला तो भेटायला गेला,
तेव्हा ज्यांच्यात तो थेट बघूच शकला नाही असे दोन डोळे वर वर शांत, निरवानिरव केलेले...
पण नीट पाहिले तर 'उन की आँखो को कभी गौर से देखा है 'फराज'?
...रोनेवालों की तरह, जागनेवालों जैसी' या फराजच्या प्राणांतिक शेर सारखे ते डोळे?
आलेल्यांशी हसताना, बोलताना, उपचार म्हणून उपचार करून घेताना,
निसटणारा प्रत्येक क्षण भरभरून पाहण्याचा प्रयत्न करणारे डोळे...
खूप पहायचं राहून गेलं हे जाणवणारे डोळे...
'गत्यंतर नाही'च्या दगडी भिंतीपलीकडे पाहू न शकणारे डोळे.
त्या डोळ्यांना काय म्हणायचं? निरोप???