प्रलय
उगाच काय गं छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वाद
उगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नाद
मी, तू , जगणे, पृथ्वी, कोणीच इतके वाईट नाही
आधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाही
अगं विरस व्हावा इतके काही उडले नाहीत इथले रंग
स्पेशल इफेक्टस्शिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंग
अजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेत
अजून तरी दाही दिशा, आपल्या आपल्या जागी आहेत
पैसे भरल्यावाचून अजून, डोळा तारे दिसत आहेत
झाडांच्याही सावल्या, अजून विनामूल्य पडत आहेत
अजून तरी कर नाही, आपले आपण गाण्यावर
‘सा’ अजून ‘सा’ च आहे, ‘रे’ तसाच ऋषभावर
अजून देठी तुटले फूल, खाली पडते जमिनीवर
छाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवर
स्पॉन्सर केल्यावाचू अजून, चंद्र घाली चांदणभूल
अजून कुठल्या वचनाशिवाय, कळी उमलून होते फूल
सागर अजून, गणतीवाचून, लाटेमागून सोडी लाट
अजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाट
थंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊन
पाऊस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदून
काही काही बदलत नाही, त्वेषाने वा प्रेमाने
जन्मानंतर अजून तसेच मरण येते इमाने
आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही
आणि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही ...........