काय मला तू द्यावे ..
छे ! सखी निराशा कसली
मागणीच नव्हती कसली
जा सुखास घेवून सा-या अन्
दुःख मला राहूदे ....
तेवढे तरी राहूदे ...
तेवढे तरी राहूदे ...!!!
ती हीच हीच ती जागा अन् हीच हीच ती वेळा
मी ग्रीष्म उभा जळणारा ,डोळ्यात तुझ्या घन गोळा
जा भिजवून सारी माती ,मृदगंध मला राहूदे ...
तेवढे तरी राहूदे ...!!!
हि सर्व स्वागते वाया , प्राक्तनात नव्हती माया
मी स्पर्शही केला नाही , तरी कशी आक्रसे काया?
जा उत्तर घेवून याचे ,अन् प्रश्न मला राहूदे ..
तेवढे तरी राहूदे ...!!!
मी प्रवासास निघताना मज पक्के ठाऊक होते
की नको नको म्हणताही होतेच चुकामुक होते
जा घेऊन सगळा रस्ता , हा ठसा मला राहूदे ...
तेवढे तरी राहूदे ...!!!
तू चंद्रच होतीस अवघी , मज म्हणून भरती आली
वाळूत काढली नावे लाटांत वाहुनी गेली
जा घेउनी जा ही भरती लाट मला राहूदे ...
तेवढे तरी राहूदे ...!!!
संदीप खरे