समुद्राकाठच्या कविता
-१
हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ’जमिनपण’
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!
-२
बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !
-३
त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !
-४
दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......
-५
खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?
-६
जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसर्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रद्न्यता......प्रिय ?
-७
मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......
-८
मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......
-९
येतो...सार्यांनो...येतो...
-१०
...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...
---------------------------------------------- संदीप .