इतर कविता
(क्रमांक-149)
--------------
मित्र/मैत्रिणींनो,
"इतर कविता" अंतर्गत मी इतर कवींच्या कविता आपणापुढे सादर करीत आहे .
पत्ते…भाउसाहेबांचे खूप गाजलेले शेर
--------------------------------
मारतो राजास एक्का, नहिल्यास दहीला मारतो
कल्पनेचे खेळ सारे, कोणी कुणा ना मारतो
पाहता कोणात काही नाही कुठेही वेगळे
सारेच तुकडे कागदाचे, छाप नुसते वेगळे
आता जरासा रंग काही खेळास येऊ लागला
पत्यातला राजा स्वतःला राजाच मानू लागला
राणीसही जाणिव काही और होऊ लागली
लाजलि नव्हती कधी ती आज लाजू लागली
दिनतेचा खेद आता दुर्रीस होऊ लागला
पंजा म्हणे चौर्र्यास आता श्रीमंत वाटु लागला
विसरून निजरुप नुसत्या नामरुपी गुंतले
भलत्याच कुठल्या अवदसेच्या पाषात आता गुंतले
नुसता उपाधी भेद कोणी राजा नव्हे राणी नव्हे
आणखी सांगु पुढे तो खेळही अमुचा नव्हे
खेळतो दुसराच, त्याला पाहिले नाही कुणी
म्हणती तयाला इश,म्हणति आल्ला कुणी, येशू कुणी
त्याचा म्हणे हा खेळ, नुसते पत्ते आम्ही पत्यातले
एका परि पत्त्यास कळले मर्म हे पत्यातले
आहे इथे रंगेल कोणी पत्ता असा पत्यातला
आहे जरी पत्यातला तो नाही तसा पत्यातला
नामरूपाचा सतःच्या पत्ताच ना त्याला कधी
ना कशाची खंत होतो राजा कधी, दुर्री कधी
हासतो नुसताच आहे सर्वाहुनी हा वेगळा
आणखी सांगाल काहो वेदांत कोणी वेगळा
– भाऊसाहेब पाटणकर
--------------------
--संकलक-सुजित बालवडकर
--------------------------
(साभार आणि सौजन्य-मराठी कविता.वर्डप्रेस.कॉम)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.02.2023-रविवार.
=========================================