दिसली कविता की,
उगीच अभिप्राय ठोकुन दे.
छान,सुंदर,ग्रेट,झक्कास..
असे उगीच काहीही फेकुन दे.
प्रोत्साहन देणे म्हणजे
झाडावर चढवणे नसते.
आपल्यातला दिसला की,
राखीव ढोल बडवणे नसते.
हीला कविता कसे म्हणावे ?
हा साधा प्रश्नही पडत नाही .
खोट्या कौतुकाच्या पुढे
इथे काही ही घडत नाही .
शब्दापुढे शब्द मांडले की,
त्याची कविता होत नाही.
आतले बाहेर ओतल्याशिवाय
तिला कवितापण येत नाही.
मला दिसतेय कविता
गटा-गटात अडकते आहे.
बिचारी दर्जेदार कविताही
एखादा वाचक हुडकते आहे.
जग बदलतेय हे खरे तर
कवितेला बदल का रूचत नाही?
चाकोरीबद्ध विषयांशिवाय
दुसरी कविताच का सूचत नाही?
कोणी रोखीत नाही म्हणून
लिहायचे म्हणून लिहू नका.
आपल्याबरोबर शब्दांचा अन्
वाचकांचाही अंत पाहू नका.
मलाच हे समजावे,
एवढा मी काही शहाणा नाही.
दिसले तेच सांगतोय
यात कसलाही बहाणा नाही.
पटले तर होय म्हणा,
नाही तर आहे तसे चालू द्या.
शेवटी कविताच सांगते
मुक्यालाही शब्दाने बोलू द्या.
वाटले तर कवितांचे
आपण पाळणेही लांबवू शकतो !
आपल्यासाठी नाही पण
कवितेसाठी तरी हे थांबवू शकतो !!
आदित्या...