म्हातारीची गोष्ट

Started by विक्रांत, April 04, 2013, 09:51:35 AM

Previous topic - Next topic

विक्रांत


म्हातारीची गोष्ट
(माझ्या सोसायटीतील म्हातारीची हि गोष्ट आजकाल प्रत्येक सोसायटीत दिसते .वाटते, कदाचित हि उद्याची माझी गोष्ट असेल .)

कोपऱ्यातल्या घरात
रहाते एक म्हातारी
उग्र चिडकी संशयी
तरीहि आहे बिचारी १
म्हातारीने पोरा होते   
इंजिनिअर केलेले 
तळहातावर होते
जणू काही सांभाळले  २
गरिबीच्या गटारात
दिवस होते काढले
मुलामध्ये भविष्याचे
सुंदर स्वप्न पाहिले ३
होता होता स्वप्न पुरे
नि टर्रकन फाटले
तिचे जीवन सर्वस्व
कुणीतरी हिरावले ४
भूल घालूनिया त्याला
दूरच्या देशात नेले
जादूच्या महालात नि
बेहोष बेधुंद केले ५
म्हातारीने मग सारे
जग पालथे घातले
पोरासाठी देव सारे
पाण्याखालीही ठेवले ६
राजा प्रधान सचिव
यंत्री तंत्री जादुगार
यांच्याकडे पोरासाठी
केले प्रयत्न अपार ७
यत्न फळत नव्हते
दिन सरत नव्हते
म्हातारीचे दु:ख अन
सतत वाढत होते ८
भेटेल त्याला म्हातारी
ते दु:ख सांगू लागली
जादूगारी सुंदरीला
त्या शिव्या देवू लागली  ९
गुणी बाळ माझा परी
भोळा म्हणत राहिली
तेच ते ऐकुनि तिला
सारीच टाळू लागली १०
वेडी झाली म्हणे कुणी
हळूच हसू लागली
सहानुभूतीने कुणी
कणव करू लागली ११
हळू हळू म्हातारी ती
अगदी एकटी झाली
आपली हार मनात
तिला कळून चुकली १२
म्हातारी मग अधिक
संशयग्रस्त बनली
साऱ्याच जगा रागाने
शापच देवू लागली १३
भुताटकीच्या घराला
कळा भयानक आली
तिची बेल वाजविण्या
सारी घाबरू लागली  १४
म्हातारीचा पोर आता
धनवान झाला होता
पोराबाळात आपल्या
चांगला रमला होता १५
गाडी घर पैसा सार
अगदी मजेत होता
म्हातारीला पैसा अन
देऊही करत होता १६
म्हातारीला सोन्याचे ते
पण अंड नको होते
कोंबडी सकट तिला
तिचे घर हवे होते १७
तिला तिच्या रक्ताचे
तिला तिच्या हक्काचे
तिला तिच्या कष्टाचे
सारे फळ हवे होते  १८
कितीतरी दिवस हे 
नाटक चालले होते
म्हातारीचे वणवण
भटकणे चालू होते  १९
एक दिवस कावून
ये म्हातारा गावाहून
नि तिची मोट बांधून
गेला तिजला घेवून २०
जाता जाता मला तेव्हा
स्पष्टच सांगून गेला
माझ्या साठीतरी आहे
आता पोर माझा मेला २१
उदास शून्य म्हातारी
काहीच नाही बोलली
डोळ्यात तिच्या विझली
तेव्हा लंका मी पाहिली  २२
पण माझी खात्री आहे
ती नक्की पुन्हा येणार
टाहो फोडत सर्वत्र 
पोरासाठी धावणार २३
मुलासाठी झगडणे
हे आता झाले जीवन
जीवनाला अर्थ आला
जणू की अर्थावाचून  २४
आज जरी सुटकेचा
एक निश्वास टाकून
संपला म्हणतो त्रास 
जातो तिज विसरून २६
कधीतरी मनामध्ये
म्हातारी मज दिसते
स्वप्न मुलानातवांचे
नि खळ्ळकण फुटते   २७

विक्रांत प्रभाकर


मिलिंद कुंभारे

विक्रांतजी!!

खूपच छान कविता आहे!

मी त्या म्हातारीचे असेच  हुबेहूब कथन अनुभवले आहे!
तुमच्या कवितेतला शब्द न शब्द आजचं अन उद्याचं
एक सत्य आहे!

म्हातारीला सोन्याचे ते
पण अंड नको होते
कोंबडी सकट तिला
तिचे घर हवे होते १७
तिला तिच्या रक्ताचे
तिला तिच्या हक्काचे
तिला तिच्या कष्टाचे
सारे फळ हवे होते  १८



अप्रतिम कविता!!! :) :) :) :) :)

विक्रांत

thanks Milind , As you said it real biting  truth .