हजारो कविता या इथे

Started by विक्रांत, August 03, 2013, 08:01:58 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

हजारो कविता या इथे
आंतरजालावरील महासागरात
रोज रोज पडत असतात
काही सुमार असतात
काही अफाट असतात
कधी यमक वृतात
कधी मुक्त छंदात
आपल्या अस्तित्वासाठी   
धडपडत असतात
या गतिमान प्रवाहात
जेव्हा मी सोडतो
माझ्या कवितेची
कागदी होडी 
तेव्हा मला माहित असते
ती थोडावेळ तरंगणार
हेलकावे खाणार
अन अखेरीस वाहून जाणार
इतर हजारो कवितेगत
मन क्षणभर दु:खी होते
पण लगेच लक्षात येते
या होडीला वा त्या होडीला
अर्थ नाही कशाला
महत्व आहे ते फक्त
होडी सोडण्याला
ती वाहणारी हलणारी
अन हळूच बुडणारी
होडी पाहण्यात
जो आनंद असतो
तोच कवितेचे कारण
आणि परिमाण असतो

विक्रांत प्रभाकर


सुमती

होड्या करतो, होड्या सोडतो
कवी दोन हेतूंनी -
कवितारचनेतला निर्मिती-आनंद,
नि मिळावी वाहवा जास्तीत जास्त
कविता वाचणार्‍या लोकांची.

"ती थोडावेळ तरंगणार
हेलकावे खाणार
अन अखेरीस वाहून जाणार
इतर हजारो कवितेगत
मन क्षणभर दु:खी होते "

दुःखाचे कारण ऐसे आहे -
कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर
ऐशा फक्त कवींना थोडक्या
चिरंतन वाहवा मिळत असते.

विक्रांत

दुःखाचे कारण ऐसे आहे -
कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर
ऐशा फक्त कवींना थोडक्या
चिरंतन वाहवा मिळत असते

छे छे ....म्हणून आपल्याला दु:ख का व्हावे ? त्यांच्याशी आपली तुलना कशी होणार, ते महाकवीच आहेत . मन दु:खी व्हायचे कारण आपले काहीतरी हरवणे हे आहे .काजव्याला माहित असते तो सूर्य नाही ते .
तुम्ही मांडलेला मुद्दा हि काही अंशी बरोबर आहे .पण दुखाचे कारण मात्र नाही .तसेच लोकसंगीतातील हजरो गाणी नावा गावा  वाचून अमर झालीच आहेत ना ? आज दत्त कवी कुणाला ठावूक आहेत .

सुमती

मोत्या, शीक रे अ आ ई!
सांगू कितीतरी बाई!

दादा, आई म्हणताती
अ आ इ ई कठीण किती;
तुजला कधी न येईल ती

म्हणू दे कोणी काही
मोत्या, शीक रे अ आ ई!

यू यू, ये ये जवळ कसा,
गुपचुप येथे बैस असा.
ऐक, ध्यान दे, शीक तसा

धडा पहिला घेई
मोत्या, शीक रे अ आ ई !

म्हणता तुजला येत नसे,
शिकवीन तुज येईल तसे
अ आ इ ई भूंक कसे

का रे भुंकत नाही?
मोत्या शीक रे अ आ ई!

- कवी दत्त

==================


मोत्या, शीक रे तू म-रा-ठी
सांगू तुज किती, भाई?

दादा, आई म्हणताती
मराठी भाषा कठीण किती;
तुजला कधी न येईल ती.

म्हणू दे कोणी काही
जे सांगते तुजला, भाई                                                                                     शिकतच ते तू राही

शिकवली तुज मी पूर्वी
क्रियापदे थोडी बरवी
शिकवते अता मी त्यांची
भूतकाळरूपे न्यारी -

करणे - केले, होणे - झाले
खाणे - खाल्ले, पहाणे - पाहिले
जाणे - गेले, येणे -आले
गाणे - गाइले, सांगणे - सांगितले.

शिकलास ना ती सारी
भूतकाळरूपे न्यारी?
हुशार आहेस भारी!
मोत्या, हुशार आहेस भारी!

चल, झोप अता तू , जरी नाही
"चललो" ऐसे रूप प्रचारी;
शिकशील तू हळूहळू सारी
आपली मराठी भाषा प्यारी!


==================

विक्रांत

#4
very good poem. you really know him ,पण मला म्हणायचे होते किती लोकांना . 

बाकी  ...कवितारचनेतला निर्मिती-आनंद, हेच खरे .

कविते संबंधी प्रत्येकाची भूमिका वेगळी असते .माझ्या ब्लॉग वर मी माझी भूमिका व्यक्त केली आहे (http://kavitesathikavita.blogspot.in/)

ती अशी ,
आपण लिहतो ती कविता आपली अनिवार्य गरज आहे, जगण्यासाठी आवश्यक आहे . हे जाणवले मग कविते साठी कविता लिहिणे सुरु झाले .सुरुवातीला हे भान अस्पष्ट होते. कविता लिहतांना लागलेली भाव समाधी ,शब्द समाधी हे कवितेने दिलेले सर्वात मोठे देणे आहे, कविता कधी सजते कधी बिघडते ही ,ते आपल्या हातात नसते .हातात फक्त लिहणे असते.त्या मुळे मी कवी आहे आणि कविता लिहितो ,याचा मला अजिबात गर्व नाही .हे तर कवितेचे मजवर उपकार आहेत .

पुन्हा आपल्या आत डोकावयला तुमच्या मुळे मिळाले ,अनेक धन्यवाद .