देवा समोर डोके आपटता तो ...

Started by विक्रांत, September 20, 2013, 10:02:25 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

देवाजीच्या समोर तो
तुमचे डोके आपटतो
मान हातात पकडून
दूर ढकलून देतो

तो तर फक्त त्याचे
काम करीत असतो
सांगणारा त्याला 
दुसराच कुणी असतो

नाही तर लाईन
संपेल तरी कशी
दानाची पेटी त्यांची
तुडुंब भरेल कशी

पैशाने येत असते
बेदरकार मुजोरी
संघटनेने येते अन 
बेताल बळजोरी

हे तर जगाला
सारेच माहित आहे
वर्षानो वर्षापासून
असेच चालू आहे

साऱ्याच देवळात हे
असेच घडत आहे
तुमच्या कँमेरात फक्त
आता दिसत आहे

बरे त्यांनी तुम्हाला का
निमंत्रण दिले होते
तुमच्याच मनी आशेने
इमले बांधले होते

लग्न व्हावे पद मिळावे
घर हवे पोर हवे
व्यापारात वृद्धी हवी
दुष्मनाचे नाव मिटावे

रोगातून बरे व्हावे 
आणि काय काय हवे
इच्छा संपत नाही
तोवर मागत राहावे 

म्हणून सांगतो तोवर तरी 
दु:ख मानू नका
त्यांच्या त्या वागण्याची
खंत ठेवू नका

त्याला मान पकडू द्या
देवा पुढे आपटू द्या
रडू नका पडू नका
नवस फेडण्या जरूर या 

विक्रांत प्रभाकर