अर्धा डाव ..

Started by विक्रांत, October 02, 2013, 03:13:08 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

चाळीस पन्नाशीच्या वयात
स्थिरावल्या संसारात
एकदिवस अचानक
जेव्हा त्याला कळते
संपू आला डाव आता
पुढे जायचे एकटे
जुळलेल्या सुरातले
गाणे हरवून जाते
एक जिनसी पिळातली
वीण सुटू लागते
त्याला तर मुळी सुद्धा
एकटे जायचे नसते
तिलाही कधी सुद्धा
एकटे राहायचे नसते

किमोची ती आवर्तने
वाया गेलेली असतात
आजाराची बीजे त्या
खोलवर रुजली असतात
आशा निराशेत झुलतांना
साठवलेली पै पै
उपचारात घालवतांना
सारी शक्ती हरवूनही
लाचार नसते ती
सारे काही विकायला
रस्त्यावर राहायला
तयार असते ती
याला आता काही सुद्धा
अर्थ उरला नाही
हे त्याला पक्केपणी
कळलेले असते
त्याने आपले प्राक्तन
स्वीकारले असते

एके दिवशी सकाळी
ती कामाला निघते
तो तिचा हात घट्ट धरतो
अन तिला विनवू लागतो
प्लीज तू जावू नको
आता फक्त तुझी
सोबत तेवढी राहू दे
बस तुला बघत बघत
उरले जीवन जगू दे

ती आतून एकदम खचते
वरवर त्याला समजावते
बरेच काही बोलते
खोटे खोटे रागावते
पण त्याचा हट्ट
काही केल्या सुटत नाही
तीच त्याची आर्जवे
काही केल्या मिटत नाही

शेवटी ती रजा टाकते
तिच्यासाठी जगणे तर
अजूनही अवघड होते
हळू हळू तो झिजत असतो
तिला पाहून रडत असतो
तरीही तिच्या सहवासात
त्याला आधार मिळत असतो
एक दिवस ती घटना घडते 
विस्कटलेले विश्व तिचे
उजाड होवून जाते
त्याचे भोगणे संपते
तिचे सुरु होते


विक्रांत प्रभाकर             

shashaank

केवळ ह्रदयस्पर्शी ....
कॅन्सरने त्रस्त असलेल्याचे विश्व व त्याचा जोडीदार - बिचारे कसे जगत असतील ? या दुखण्याला कसे तोंड देत असतील कोण जाणे ????


विक्रांत

धन्यवाद शशांक ,वैशाली .
या दुर्दैवी घटनेचा एक साक्षीदार होतो मी .जीवन खरच कठोर भासते तेव्हा .