भक्ती गझल

Started by केदार मेहेंदळे, October 25, 2013, 03:19:29 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

वृत्त: आनंदकंद
लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा


शोधून सापडेना नुस्ता प्रयास झाला
आता सुरु नव्याने माझा प्रवास झाला

माणूस तोडला मी संन्यास पाळला मी
देवास शोधताना भलताच त्रास झाला

भजनात दंगलो मी ठेक्यात गायलो मी
मोहात गुंतलो मी हा खास फास झाला

नामात रंगलो मी देवूळ बांधले मी
मूर्तीत देव नाही का आज भास झाला?


थकलो पळून जेंव्हा बसलो जरा कुठे मी
आले मनात माझ्या हा शोध बास झाला

विश्वास अंतरी पण येईल राम माझा
नामात रंगलेला प्रत्येक श्वास झाला

व्याकूळ या मनाने मी हाक मारली अन
तो अंतरीच माझ्या मजला अभास झाला

केदार...........


या गझलितला 'आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला' हा मिसरा श्री सारंग भणगे यांच्या गाझलीतला आहे.