चक्रव्यूह

Started by sudhanwa, April 27, 2014, 03:05:58 PM

Previous topic - Next topic

sudhanwa

काल आज उद्या,
यांच्याच चक्रात अडकलोय
काय करायचय कळत नाही,
अभिमन्युही उत्तर शोधतोय

काल ज्यांची साथ होती,
आज त्यांनी टांग मारली
भरवसा उद्यावर ठेवू कशाला,
आजचं जरही 'साथ' पसरली

उद्याच्या जबाबदारींच ओझं,
काल स्वप्नातही नव्हतं
आज जाणीव असूनही,
मन सारखं कचरत राहतं

उद्याच्या सुखांसाठी, घर घेतलं
कर्ज काढून,
बाज़ारी झालो आज,
आजचं जगणं उधार ठेवून

स्वप्नांची व्याख्या आम्ही,
भविष्याशी जोडून ठेवली
वर्तमानात जगणार्यांची,
शब्दकोषानं नाही फिकीर केली

उद्याच्या 'उदया'साठी,
आकाशी नज़र लावतो
जिंकीन सारं जग म्हणतो,
आजचं अस्तित्व विसरून जातो

इतिहासही त्यांनीच रचला,
ज्यांनी वर्तमानात अंमल केला
भविष्याची चिंता कशाला,
अभिमन्युही आजचं जगला (२)
                                - सुधन्वा