प्रेमाला मी भीत आहे

Started by विक्रांत, July 03, 2014, 10:41:03 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



कलंकित देह माझा
कलंकित मन आहे
पदी तुझ्या वाहू कसं
मलीन जीवन आहे

फसलेल्या जन्मातील
एक रानभूल आहे
लुटलेल्या बागेतील
फेकलेलं फुल आहे

नाव तुझे घेवू कसं
उरामध्ये खंत आहे
अपमान वंचनेत
अजुनी जळत आहे

तुझे हात आश्वासक
मज धीर देत आहे
डोळ्यातून कृपा प्रेम
बरसात होत आहे

वदलास कधी कुठ
प्रेम देहातीत आहे
मागील ते तुझं सारं
भूतकाळ फक्त आहे

येशील तू कधी तरी
सदैव स्वागत आहे
नात्या पलीकडचं हे
तुझं माझं नात आहे

सुखावते ऐकुनी मी
माझं कुणी इथं आहे
जळलेलं मन पुन्हा
उमलून येत आहे

तुझी प्रीत तुझं गीत
सुख पालवीत आहे
अजूनही माझ्या पण
प्रेमाला मी भीत आहे

विक्रांत प्रभाकर