तिचे केस धुतांना ...

Started by विक्रांत, July 09, 2014, 11:51:42 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

डोईवरी मेंदी तिच्या
अचानक पाणी गेले
भाग्यवशे माझ्या मग
तिचे केस धुणे आले

झुकलेली मान थोडी
मिटलेले घट्ट डोळे
हिरवट पाणी होते
गालावरी ओघळले

दीर्घ ओले श्वास उष्ण
जलामध्ये भिजलेले
रक्तवर्ण ओठ आणि
हुंकारात उघडले

भिजलेल्या केसांवरी
हात तरंगत होते
मुलायम स्पर्शामध्ये
मन उंडारत होते

पुसूनिया गेली मेंदी
वाहुनिया गेले पाणी
गुंतलो मी केसांमध्ये
वदलो नि धजावूनी

आज सखी केस तुझे
देवू काय मी पुसुनी
हलकेच हसुनी ती
होय म्हणाली मानेनी

पुसतांना केस, मेंदी
रोमरोमी गंधाळली
अलगद मिठीमध्ये
येवूनिया बिलगली

विक्रांत प्रभाकर







सतिश

अतिशय सुंदर कविता आहे विक्रांतजी  ..

Çhèx Thakare