आता सुरू नव्याने ( तरही )

Started by madhura, July 28, 2014, 10:10:54 AM

Previous topic - Next topic

madhura

ध्येयास गाठल्याचा नुसताच भास झाला
आता सुरू नव्याने माझा प्रवास झाला

खेडे नकोनकोसे, शहरी विकास झाला
अन् पार मारुतीचा आता भकास झाला

नेता गुन्हा करोनी मोकाट मस्त फिरतो
फर्जीच पंचनामा, जुजबी तपास झाला

गरिबार्थ योजनांना, खाती किती गिधाडे !
अन् आम आदमीला, निर्जळ उपास झाला

शब्दात मांडण्याला आहे असे कितीसे?
लिहिण्या कथा, पुरेसा अर्धा समास झाला

आजी घरात नाही, बाळास पाळणाघेर
एकत्र नांदण्याचा केंव्हाच र्‍हास झाला

फुटली जशी गुन्ह्याला वाचा, तिच्या शिलाला
डागाळण्या किती तो ओंगळ प्रयास झाला !

भांडून दूर झाले पत्नी, पती परंतू
त्यांचा गुन्हा नसोनी गुदमर मुलांस झाला

घरचे नकोच जेवण, बर्गर, पिझा हवासा
पाश्चात्त्य संस्कृतीचा वावर झकास झाला

"निशिकांत" पाडसांना लावू नकोस माया
उडता पिले मलाही भरपूर त्रास झाला

निशिकांत देशपांडे.