गझल: लगावली: गागालगा/लगागा/गागालगा/लगागा

Started by madhura, July 28, 2014, 10:16:50 AM

Previous topic - Next topic

madhura

नाहीस वेचले तू, वेचेल अन्य कोणी!
मी एक फूल आहे, माळेल अन्य कोणी!!

दे राजरोस फाटा, वा टाक कोप-याला......
मथळ्यासमान मजला छापेल अन्य कोणी!

दगडावरील काळ्या, मी एक रेघ आहे!
माझीच री पुढेही.....ओढेल अन्य कोणी!!

तरळू नकोस देऊ डोळ्यांत भाव माझे....
नसल्यावरी इथे मी, वाचेल अन्य कोणी!

हे फक्त एक पुस्तक नाही....असे स्वत: मी!
विसरू नकोस कोठे, चाळेल अन्य कोणी!!

वेळीच हृदय माझे ताब्यात घे तुझ्या तू!
समजायच्याच आधी, लाटेल अन्य कोणी!!

तू खूप आवडीने लिहिलेस नाव माझे;
ते नाव ऎनवेळी वगळेल अन्य कोणी!

-------प्रा.सतीश देवपूरकर