गझल: जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!

Started by madhura, July 29, 2014, 10:26:16 AM

Previous topic - Next topic

madhura

गझल
वृत्त: मात्रा वृत्त
मात्रा: १४+१४=२८
********************************************************
जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!
घेवून किनारा सोबत लाटांनी प्रवास केला!!

अव्याहत ऎकू येते नि:शब्द हाक कोणाची?
पांगळे तरीही माझ्या शब्दांनी प्रवास केला!

झुंडीवर झुंडी आता चालतात त्यांच्या मागे.......
पण हयातभर एकाकी शिखरांनी प्रवास केला!

माझ्या तुझ्यात आकाशा! हाकेचे अंतर होते;
तुजसाठी युगे युगे मी पायांनी प्रवास केला!

व्रण झाले फिके परंतू सल तसेच उरले मागे;
कोणाला कळू न देता जखमांनी प्रवास केला!

नादातच त्याच्या त्याच्या सुख आले अन् गेलेही....
मग माझ्या बरोबरीने दु:खांनी प्रवास केला!

किलकिली तरी कर दारे अन् खिडक्या तुझ्या मनाच्या
मैलो न मैल तुजसाठी किरणांनी प्रवास केला!

रुचल्या न कधी पायांना या पायघड्या सुमनांच्या;
मी जन्मभरी काटेरी रस्त्यांनी प्रवास केला!

सत्याचे केवळ मृगजळ पाहिले दूरवर....त्यांनी;
इतक्याच शिदोरीवरती स्वप्नांनी प्रवास केला!

अद्याप लागला नाही तळ तुझ्या मनाचा पुरता;
सोसणार नाही इतका स्मरणांनी प्रवास केला!

सोडला हात झाडांनी, फांद्याही पहात होत्या;
वा-याच्या झोतावरती पानांनी प्रवास केला!

त्या मानस सरोवराचा ओढाच असा होता की,
टाकून नभाला मागे पक्षांनी प्रवास केला!

-------प्रा.सतीश देवपूरकर

जयंत पांचाळ


मिलिंद कुंभारे

जिंदगीस वाट विचारत श्वासांनी प्रवास केला!
घेवून किनारा सोबत लाटांनी प्रवास केला!!

क्या बात ..... :)


RR

रुचल्या न कधी पायांना या पायघड्या सुमनांच्या;
मी जन्मभरी काटेरी रस्त्यांनी प्रवास केला!

सत्याचे केवळ मृगजळ पाहिले दूरवर....त्यांनी;
इतक्याच शिदोरीवरती स्वप्नांनी प्रवास केला! Khuuup chan