बैरागी

Started by विक्रांत, September 11, 2014, 10:01:01 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

घर दार टाकुनिया   
नांवगाव पुसलेले 
बेवारस अस्तित्वाचे
बैरागी दूर निघाले   

हातामध्ये झोळी काठी
वर केस बांधलेले
लुंगी शाल देहावर
भाळी नाम कोरलेले
 
जगामध्ये असूनही
सारे जग तुटलेले
सरलेल्या जीवनाचे
ओझे खोल गाडलेले

कुणी अलिप्त अबोल
तुळस भांगेमधले
कुणी धुरात पांढऱ्या
स्व:खुशीने गुंतलेले

अन्नासाठी जरी कुणी
वेषांतरही केलेले
कुणी चिंता सोडूनिया 
देहाला लाथ मारले

या चेहऱ्या नाव असे   
मेंदूमध्ये लिहिलेले
प्रीती स्मृती गोष्टी किती
उरामध्ये जपलेले

काही पाने सुटलेली
कवितेच्या वहीतली
घडीच्या होड्या होवून
जलधारेत पडली

कुणीतरी लिहितांना
अर्धी वा टाकूनी दिली
एक उदास कहाणी
शेवट न सुचलेली

विक्रांत प्रभाकर