वास्तव

Started by Anil S.Raut, September 22, 2014, 11:56:13 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

              `क्यु´ आणि `क्यूँ ´?
                      पाणी
`शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा...!´ही बातमी वर्तमानपत्रात छापून येते आणि दोन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करुन ठेवण्यासाठी चाळ,झोपडपट्टी,मध्यमवर्गियांची वस्ती इथल्या सार्वजनिक नळावर चड्डीतल्या पोरापासून `वाकलेल्या कंबरेपर्यंत´ सा-यांची एकच रांग लागते.
रांग म्हटले कि नंबर आलेच.पुन्हा मागचा नंबर,पुढचा नंबर अशा नंबरा-नंबरातून ही रांग `शेलक्या´ नंबरापर्यंत पोहोचते.एवढयावर भागलं तर ठीक नाहीतर हीच नंबराची रांग `हाता´पर्यंत येते.या सगळया बारा भानगडीत एका व्यक्तीमागे पाच-पंचवीस भांडयांची लांबच लांब रांग लागते.पून्हा त्या भांडयांचीही `हात´घाईची लढाई....अशातच जर पाण्याचा `दाब´ कमी असेल तर वरील सर्व घटनाक्रमांचा `जोर´ आणखी वाढलेला...आणखी वाढलेला...आणखी वाढलेला...तोपर्यंत नळाच्या पाण्याला वाहून वाहून कंटाळा आलेला असतो आणि त्याने `लोकशाही´त हमखास आणि सर्रास वापरला जाणारा  `बंद´चा पर्याय स्वीकारलेला...झालं! पुन्हा तुझ्यामुळे मला आणि तुमच्यामुळे आम्हाला पाणी मिळालं नाही ह्या किर्तनात  दोन दिवसानंतर पाण्याने `बंद´ मागे घेतलेला असतो. पुन्हा मागचेच रहाटगाडगे पुढे सुरु!
हे झालं उघडया मैदानावर(जागेवर) आणि उघडया डोळयांनी दिसणारं दृश्य! फक्त तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांनाच ते दृश्य दिसतं हे त्यातल्या त्यात विशेष आणि विशेष यासाठी कि ते फक्त आपल्यालाच दिसतं.अर्थात दिसुनही आपण काहीच करु शकत नाही म्हणून आपल्याला ते दिसतं!उलट ज्यांना दिसायला हवे त्यांना ते दिसत नसतं.म्हणजे `मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही´ हेच खरं!
आता हे झालं उघडया जागेवरचं आणि उघडया डोळयांनी दिसणारं दृश्य.इथे तुमच्या-आमच्यासारख्यांचे डोळेही उघडे असतात आणि `वाचे´ला तर `पांडित्य´च प्राप्त झालेले असते.या सगळयातून सवड काढूून आपण जरा तुम्ही आम्ही निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या आणि त्यांनी `वशिल्यावर´ चालवलेल्या नोकरशाहीच्या(अर्थात एका झाडाची एकच फांदी नमुन्यासाठी किंवा दुस-या शब्दात भाताची परिक्षा शितावरून घ्यायची असते) घरात डोकावून बघुया.....
चौफेर  `हरित´ कुंपणाच्या वेष्टणात असलेला अमुक-अमक्या नगरसेवकाचा (हे एक शित) अलिशान बंगला...बंगल्याच्या आवारातच एक म्हणता दोन नळांच्या तोटयांना रबरी पाईप बसवुन बागेला (हरित कुंपणाला) चोविस तास पाण्याची आंघोळ!शिवाय स्वतःच्या मालकीचे एक-दोन बोअर!बोअर यासाठी कि नळाला कधी-कधीच शुध्द पाणीपुरवठा होतो हे त्यांना चांगलंच माहित असतं म्हणून बोअरचं पाणी त्यांना स्वतःला पिण्यासाठीआणि नळाचे पाणी बागेला पाजण्यासाठी!सगळया बंगल्यात `किचन´पासून `बाथरुम´पर्यंत आणि `वाँशबेसिन´पासून `मेकअप रुम´पर्यंत इथून तिथून नळ फिटींग.मोठयांच्या मोठया भानगडी असतात गडया...आपण बाहेरच्या बाहेरच डोकावून बघुया.
हे असं आणि असंच अजून बरंच काही आपल्या डोळयांना दिसतं.मात्र सार्वजनिक नळावर `पांडित्य´ प्राप्त झालेली आपली `वाचा´ हे दिसत असुनही `बसलेली´असते,कारण त्या `शिताचा´एक हात आपल्या मानेवर(डोकयावर नव्हे!)असतो आणि दिसरा आपल्या तोंडावर! `तोंड उघडले तर मानेला शिक्षा! ´
  महानगरपालिका,नगरपालिका,नगरपरिषद तीच;नळाला येणारे पाणी तेच;त्या पाण्याचा करही सारखाच...मग आपल्याच नशिबी `क्यु´ (रांग) का?आखिर ऐसा क्यूँ ?
...शेवटी एकच-त्या `क्यु´ला `पर्याय´ नाही आणि या `क्यूँ´ला `उत्तर´ नाही हेच खरं!
                                        जय लोकशाही!
                       अनिल सा.राऊत
                        9890884228