युती (एक राजकीय हझल)

Started by केदार मेहेंदळे, September 25, 2014, 10:26:19 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

नेत्यांस या युतीचा, आधार पाहिला मी
गणितात बांधलेला, संसार पाहिला मी

सत्तेत काल त्यांचा, तुटला जरी घरोबा
जाहीर आज त्यांचा, शृंगार पाहिला मी

फुटता जहाज येथे, उंदीर जे पळाले
देशात आज त्यांचा, बाजार पाहिला मी

बंडात घोषणा त्या, होत्या बुलंद ज्याच्या
श्रेष्ठीं पुढे सदा तो, लाचार पाहिला मी

बाणात आजही त्या, आहे थरार.... (मग का?)
कमळा मुळे इथे तो, बेजार पाहिला मी!

राज्यात या शिवाचा, आहे जरी दरारा
भरला इथे ''शहा''चा, दरबार पाहिला मी

मतदार भाबडे हे, लावून आस बसले
(स्वप्नास वास्तवाचा, शेजार पाहिला मी)

केदार...

वृत्त: आनंदकंद
लगावली: गागाल गाल गागा/ गागाल गाल गागा
मात्रा १२ +१२