अध:पतन

Started by विक्रांत, October 31, 2014, 11:24:40 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


कुत्र्यासमोर हाड फेकावे 
तसा तिने तिचा देह
त्याच्या समोर टाकला
अन म्हणाली
हा देह तुझ्या मालकीचा
पण होणार नाही कधीच
तू माझ्या मनाचा
तेव्हा त्याचेच घर
त्याला वाटू लागले 
एखाद्या वारांगनेची कोठी
आणि तो स्वत:
पैसा फेकून देह भोगणारा
वासना कृमी
कुणाचे अध:पतन आहे हे
त्याचे तिचे का घराचे ?
का जीवनाने उभे केलेले हे
नाटक आहे कडेलोटाचे ?
देहाची लाज वाटली त्याला
वासनेची लाज वाटली त्याला
लग्नाची लाज वाटली त्याला
अन स्वत:च्या निर्लज्जपणाची
लाज वाटली त्याला
तो तिचा शेवटचा स्पर्श
अन शेवटचा अव्हेर
तेव्हा पासून
त्याच्या मनाच्या डोहात
भरले एक काळेकुट जहर
सुखाचा प्रत्येक अंकुर
जाळून टाकणारा
येणाऱ्या प्रत्येक हास्याचे
प्राण घेणारा
आणि त्याच्यासाठी ती झाली
सजीव पाषाण प्रतिमा
प्रेमाचा लवलेशही नसलेली
अंतर्बाह्य काठीण्य ल्यायलेली
तिच्या त्या कातळी जगात
आत्ममग्न कोषात
एकटीच जगणारी
अन तो
चिरंतन चितेत जगणारा
जिवंत देह

विक्रांत प्रभाकर