आजोबांच्या ट्रंकेत

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 26, 2014, 06:37:10 PM

Previous topic - Next topic
आजोबांच्या ट्रंकेत

आजोबांच्या ट्रंकेमध्यें
ढब्बू पैसे आहेत चार
बंदा रूपया चांदीचा
जपून ठेवलाय जीवापाड 

ट्रंकेमध्यें आहे त्यांच्या
पोषाख एक खादीचा
त्यातच त्यांनी लपवलाय
फोटो माझ्या आजीचा

छोटी दोन पिस्तुलेही
आहेत त्यात जर्मनची
ग्रामोफोनच्या तबकड्या ज्यात
गाणी एस्.डी. बर्मनची

स्वातंत्र्यलढ्यात आजोबांनी
भोगला होता कारावास
मोठ्मोठ्या नेत्यांशी
दोस्ती त्यांची होती खास

लढ्यात होते त्यांच्यासोबत
मोठे बंधू भाऊ, दाजी
खंबीरपणे त्यांच्यापाठी
राहीली होती तेव्हां आजी

त्यावेळचे खूप फोटो
आहेत त्यांच्या साठवणीत
ट्रंक उघडून बसतात तेव्हां
रंगून जातात आठवणीत

हल्ली तर आजोबा
नेहमीच ट्रंक उघडतात
जवळ कोणी गेलं तर
त्याच्यावरती बिघडतात

खचून गेलेत आजोबा
आजीच्या जाण्याने
फोटो बघत आजीचा
डोळे भरतात पाण्याने