मनावरी वळ जरी

Started by विक्रांत, December 24, 2014, 09:43:34 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

काही शब्द फक्त इथे
बाकी सारे जग रिते
नव्हतेच माझे कधी
जपलेले काही कुठे

दिसभर मनामध्ये
रुणझुण वाजणारे
रातभर कानामध्ये
किणकिण करणारे

वाटतात भास होते
उभा जन्म वागवले
शोधुनीही सापडेना
धागे काही जुळलेले

मनावरी वळ जरी
वेदनाही भ्रम वाटे
पोकळीत नसण्याच्या
जाणीवेचा नाद आटे

तरंगतो काळ काही
मिटलेल्या मनावरी
त्याच त्याच प्रेतयात्रा
वाहतो नि खांद्यावरी

काजळल्या वातीसवे
जाणण्याची आस खुंटे
सावलीचे भिंतीवरी
उमटून चित्र मिटे

विक्रांत प्रभाकर