विजेला जायचेच असते का सारेच जाळून

Started by विक्रांत, February 09, 2015, 08:32:22 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

मानही न वळवता तू गेलीस
मला पाहूनही न पहिल्या सारखी
क्षितिजाच्या कडेकडेनी
अंग चोरुन गेलेल्या नभासारखी
अन मी कललेला भिंतीवर
तसूभरही न हलता
उभा होतो मख्खा सारखा
दृष्टीच्या विस्तारातून पाहत तुला
हळू हळू अंधुक होणाऱ्या नजरेनी ..
असेही कधी होईल
वाटले नव्हते मला
तू गेलीस अन
मोहळ उठल्यागत मन
तुझ्या आठवांनी उधाणून आले
तुझे हसणे बोलणे रुसणे ..
अन ते शेवटचे चिडणे
तळव्यात घुसलेल्या काट्यागत
अचानक अनपेक्षित
मी विव्हळ अन विदीर्ण
माझ्यातच भग्न
अन तू सुटलेल्या बाणासारखी
गेलेली माझ्या शब्दांना धुडकारून
कारण न घेता समजून 
तेव्हा ही तुझे अभिमानी मन
लखलखत होते
तुझ्या डोळ्यातून अन चेहऱ्यातून
विजेला जायचेच असते का सारेच जाळून

विक्रांत प्रभाकर