कसा बोलू , माझा देश महान

Started by sanjay limbaji bansode, February 14, 2015, 11:03:09 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

मोठे, मोठे होत चालले
लहान आणखीन लहान
पुस्तकापुरतच उरल बाप्पा
शेतकरी देशाची शान
बियाच्या खरीदीसाठी ठेवतो तो
बायकोच मनी डोरलं गहाण
मंग सांग बाबा कसा बोलू
मी, माझा देश महान !!

गरीब पोटासाठी झुरं
त्यापेक्षा श्रीमंताच कुत्र बरं
जगते ऐशो आरामात
संध्याकाळी बिनफिकीर फिरं
आम्हांला मात्र पोटाचाच घोरं
माणूस असून झालो ढोरं
आता खिशात दमडी नाय
मंग काय बघू मी म्होरं
मोठ्या नेत्यान लिहून ठेवलं
जय जवान जय किसान
मंग सांग बाबा कसा बोलू
मी, माझा देश महान !!

बारा महीने तेरा काळ
नित्य नेमाने कष्ट करतो
होईल तेवढे विकून
सावकाराचे कर्ज फेडतो
सांगू कुणाला माझी दशा
मी अन् माझ नसीबच रडतो
पोट भरता भरता
महागाईशी ही लढतो
दुष्काळाने झोडपले तर
उपाशी पोटी मरतो
तरीही बाप्पा शेतकरी म्हणे
या देशाची शान
मंग सांग बाबा कसा बोलू
मी, माझा देश महान !!


संजय बनसोडे