मी 'पुरुष' बोलतोय !!!

Started by janki.das, November 25, 2009, 09:51:07 AM

Previous topic - Next topic

janki.das

आज International Men's Day..ब्लॉग्स सर्फ करताना सापडलेली ही एक पोस्ट...बघा वाचून :)

दचकलात ना ? विचार करत असाल की आज अचानक पुरुष कसा काय बोलायला लागला आणि नेमकी त्याला अशी बोलायची का गरज पडली. सांगतो...आज १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुष दिन. कित्येक जणांना तर आज पुरुष दिन आहे हेच मुळी माहित नसेन. पुरुषप्रधान असं म्हणवल्या गेलेल्या समाजात जेव्हा फक्त स्त्री दिनच साजरा व्हायला लागला तेव्हाच मला जाणवलं की मला आता बोललचं पाहिजे. मी इथे माझ्या न्याय, हक्क, अधिकार अशा कुठल्याही गोष्टी संबंधीच भाष्य करायला आलेलो नाही. फक्त पुरुषांच्या चार मनातल्या गोष्टी तुम्हा सर्वांना समजाव्यात म्हणुनच मला वाटलं की आज मला माझी कैफियत मांडलीच पाहिजे.

तुमच्या आजुबाजुला तुम्ही मला अनेक रुपात पहात असता. कधी बाप, कधी मुलगा, कधी नवरा तर कधी भाऊ. माझा जन्मच मुळी असतो ते जबाबदारी पार पाडण्यासाठी. प्रत्येक रुपामध्ये मला माझ्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडावी लागते. अगदी लहानपणापासुनच माझ्या मनावर बिंबवल गेलं की तुला भरपुर अभ्यास करायचाय, अभ्यास करुन मोठं व्हायचंय. मोठं होणं म्हणजे दाढी-मिश्या येणं हेच त्याला ज्या वयात समजत असतं त्यावेळेस त्याच्यावर करिअर चा ताण येतो. करिअर, पैसा हेच आपल उद्दिष्ट आहे आणि ते जर असेन तर बाकी काही ही मिळवता येत हे माझ्या मनावर बिंबवल जात आणि एवढ्या लहान वयापासुनच मग सुरु होतो संघर्ष.. जगण्यासाठी आणि आपल्या वर अवलंबुन असणारया लोकांना जगविण्यासाठी.

जसा जसा मी मोठा होतो तसा माझ्यावरच्या जबाबदारीची मला जाणीव करुन दिली जाते. करिअर, पैसा या गोष्टी सर्वस्व आहेत आणि ते कमावताना मी स्वत:चे छंद, आवडी निवडी हे सुद्धा विसरुन जातो. पुरूषाने बाहेरची कामे करावीत आणि घरी पैसा आणावा. त्यातुन मग त्याच्या बायकोने घर संसार चालवावा असा या समाजाचा नियम. बाहेरच्या जगात वावरताना मला हजार गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कित्येक प्रकारचे टेन्शन असे असतात की मी ते मनमो़कळेपणाने कुणाला सांगु ही शकत नाही. अशी सर्व प्रकारची दु:ख मग मी स्वत:च गिळायला शिकतो. यातुनच मग माझा स्वभाव शांत शांत तर कधी तापट बनतो. कदाचित म्हणुनच प्रत्येकाचे वडील एकतर खुप शांत, समंजस वा एकदम तापट असतात. हा समाजच पुरुषाला असं बनवतो.

बरयाच वेळा मी सकाळी लवकर कामाला निघतो, दिवसभर काम-काम, रात्री लवकर जाऊन बायको-मुलांबरोबर थोडा वेळ घालविण्याची इच्छा असते पण बरयाच वेळा कामामुळे ती ही पुर्ण होत नाही. मुलांना मी फक्त रविवारीच दिसत असेन ते पण आठवड्यातील तुंबलेली काम करताना. वडील म्हणजे एक कामाला जुंपलेला बैलच जणु. आपल्या मुलांबाळांच्या प्रत्येक गरजा पुर्ण करण्यासाठी मी रात्रंदिवस झटत असतो. कधी बायकोच्या मागण्या, कधी मुलांचे हट्ट, कधी आई वडीलासाठीची कर्त्यव्य पुर्ण करता करता माझं तारुण्य माझ्या हातातुन कधी निसटुन जातं हे मला ही समजत नाही. टक्कल फक्त पुरुषालाच का पडतो वा पुरुषाचेच केस लवकर पांढरे का होतात असा जर तुम्हाला कधी प्रश्न पडलाच तर हे त्याच उत्तर. माझ्या आजुबाजुच्या, जिवलगांसाठी मी अगदी जेवढं काही शक्य आहे ते करतो. मी जर हे सगळ करता करता गचकलोच तर माझ्या मागच्यांचं काय हा प्रश्न मला नेहमीच सतावत असतो. त्यासाठीच मी स्वत:चं मरण सुद्धा 'इन्शुअरड' करुन ठेवतो.

बरयाच वेळा असा आरोप होतो की 'पुरुष हे कठोर असतात'. खरच सांगतो तुम्हाला, मी वरुन कितीही कठोर वाटलो तरी आतुन तसा बराच हळवा आणि संवेदनशील आहे. पण हा हळवेपणा मला कधीच समोर आणता येत नाही, अगदी मनात असुनसुद्धा. मी जेवढा कठोर तेवढाच वेळप्रसंगी एका स्त्री पेक्षा जास्त हळवा होतो. मुलगी सासरी जाते तेव्हा त्या बापाचं दु:ख त्यालाच माहित. सगळेजण जेव्हा तिला निरोप देत असतात तेव्हा आयुष्यात कधीही न रडलेल्या बापाच्या डो़ळ्यांत सुद्धा पाणी तरारतंच. तो बाप म्हणजे मी, एक पुरुषच. मला एका पुरुषापेक्षा एक स्त्रीच जास्त समजावुन घेऊ शकते. म्हणुनच मुलाचं आणि आईचं तर मुलीचं आणि वडीलांचं जास्त पटत असावं.

मला स्वत:चं दु:ख जाहिरपणे मांडण्याची मुभा नसते. माझं सर्वात मोठं दु:ख म्हणजे मी दु:खातही डोळ्यांत अश्रु आणु शकत नाही. पुरुषाचा पुरुषार्थ हा दुसरयांचा आसवं पुसण्यात आहे, स्वतःचं दु:ख दाखविणे हा माझा दुबळेपणा समजला जातो. एखादी स्त्री जशी मनमो़कळेपणे रडु शकते तसा मी नाही करु शकत. रडणं हा प्रांत आतापर्यंत स्त्रीचाच मानला गेलेला आहे. पुरुष जर कधी रडताना दिसलाच तर "काय बाई बायकांसारखा रडत होता तो.." अशी वाक्य ए॑कायला मिळतात. पुरुषाने दुसरा एखादा रडत असताना त्याला धीर द्यावा, स्वतःचा खांदा त्याला रडण्यासाठी द्यावा. पण स्वत: अतीव दु:खात असताना आतल्या आत आसव गिळावित असा आतापर्यंतचा अलिखीत नियम. मला नेहमीच दुहेरी कसरत करावी लागते. स्वतःला सावरण्याची आणि स्वत:चं दु:ख गिळण्याचीही. एकदा खुप रडु आलं असतानाही डोळ्यांत पाणी येऊ न देण्याचा प्रयत्न करुन पहां, तेव्हाच समजेन तुम्हाला माझं दु:ख.

अजुन बरंच काही आहे लिहिण्यासारखं. पण कधी वेळ मिळालाच तर याच पुरूषाच्या डोक्यावरुन एकदा हात फिरवा वा त्याचा हात हातात घ्या. त्याच्या हाताला पडलेले घट्टे तुम्हाला जाणवतील. हेच हात तुम्हाला सुखी ठेवण्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. तुम्ही जेव्हा तुमच्या घरी सुखाने चार घास खात असता तेव्हा हेच हात त्या चार घासाची सोय करण्यासाठी राबत असतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणीही असा,स्त्री किंवा पुरुष, आपल्या जवळच्या मग ते तुमचे बाबा, मुलगा, नवरा किंवा भाऊ कुणीही असो, यांचा चेहरा एकदा डोळ्यांसमोर आणा. त्यांनी तुमच्यासाठी काय काय केलं हे आठवा आणि फक्त एकदाच त्या 'पुरुषाला' सलाम करा, सलाम करा त्याने आतापर्यंत तुमच्यासाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींसाठी. सलाम करा...औपचारिकता म्हणुन नव्हे तर तुमच्यावरचं एक ऋण म्हणुन !



( हा लेख म्हणजे स्त्री आणि पुरुष यात पुरुषच श्रेष्ठ वगैरे गोष्टी सांगण्यासाठी किंवा पुरुष दिनानिमित्त पुरुषांना त्यांचे न्याय हक्क वा अधिकार समजुन देण्यासाठी लिहीलेला नसुन फक्त पुरुषांच्या मनातल्या चार गोष्टी तुम्हा लोकांना कळाव्यात म्हणुन लिहीलेला आहे. स्त्री आणि पुरुष हे समान आहेत या विचारांचा मी सुद्धा आहे. तरी कूपया कुठल्याही स्त्रीने या लेखाविरुद्ध आक्षेप घेऊ नये वा स्त्री मुक्ती केंद्राची द्वारे ठोठावु नयेत :-). पुरूष हा स्त्री विना अपुरा आहे आणि स्त्री पुरुषाविना हे सत्य आहे. )

santoshi.world