भुलभुलैय्या

Started by marathi, January 25, 2009, 11:48:13 AM

Previous topic - Next topic

marathi

"भुलभुलैय्या" हा व. पु. काळे यांच्या चमत्कृतिप्रधान कथांचा - फॅंटसीजचा - संग्रह. गेल्या वीस वर्षांत वपुंनी लिहिलेल्या फॅंटसीजपैकी निवडक अशा फॅंटसीजचा समावेश या संग्रहात करण्यात आलेला आहे.
सद्य:कालीन मध्यमवर्गीय माणसाला आहे त्या परिस्थितीतही जीवनाचा उत्कट आनंद कसा लुटता येईल याचा जणू संदेश देण्यासाठी व. पु. काळे यांच्या चमत्कृतीपूर्ण कथांचा अवतार आहे. मात्र हा संदेश देण्यासाठी वपुंनी या कथा लिहिल्या आहेत अशी बोचरी जाणीव वाचकाला कुठेही होत नाही, याचे श्रेय या कथांना दिलेल्या "फॅंटसीज"च्या अवगुंठनात आहे. व.पु. काळे यांच्या खोडकर, मिश्किल निवेदनशैलीमुळे वाचक या कथांकडे खेचला जातो. मानवी चांगुलपणावर वपुंची श्रद्धा आहे. जीवनातील विरोधाभासाने ते भयचकित होतात, पण परमेश्वराच्या योजनेत काही हितकारक सूत्र आहे याची ही त्यांना खात्री वाटते, त्यामुळे या सार्‍या व्यवहारांचे उदात्तीकरण करणे त्यांना विलोभनीय वाटते. त्यामुळे वाचकाची जीवनावरची श्रद्धा कळत-नकळत दृढ होते, जीवनावर त्याचे प्रेम बसते, त्याला जगावेसे वाटते.
लेखक-कलावंताला यापेक्षा दुसरे काय हवे असते?
-- शंकर सारडा